राजकारण

१२ आमदारांच्या नावाच्या फायली वादळात वाहून गेल्या असाव्यात; राऊतांची पुन्हा खोचक टीका

मुंबई: विधान परिषदेच्या १२ नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केलं आहे. मोदींनी सर्जिकल स्ट्राईकही २४ तासांत केला होता. पण सहा महिने उलटले तरी राज्यपालांचं नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत संशोधन सुरूच आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. १२ जणांचं सदस्यत्व रोखून ठेवणं हा घटनेचा भंग आहे. यात राजकारण असून हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. राजभवनात काही तुफान आलं असावं आणि त्या वादळात फाईल वाहून गेल्या असाव्यात. किंवा तिथे भूतप्रेत आलं असेल म्हणूनच त्या फायली गायब झाल्या, अशी टीकाही त्यांनी केली.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा राज्यपालांवर टीका केली. सहा महिने झाले. त्या फाईलवर निर्णय नाही. राज्यपालांचं कोणतं संशोधन सुरू आहे? मोदींनीही 24 तासात सर्जिकल स्ट्राईक केला होता. पण राज्यपालांना निर्णय घेता येत नाही, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे. आज १२ सदस्यांची नियुक्ती झाली असती तर आमदार म्हणून त्यांनी कोरोना काळात जोमाने काम केलं असतं, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी कोकणातील वादळामुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्यावरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री नुकसानग्रस्तांना मदत करतीलच. पण महाराष्ट्राला लुटायचं काम दिल्लीवाले करत आहेत. त्यांची काही जबाबदारी नाही का? असा सवालही त्यांनी केला. तुम्ही गुजरातला एक हजार कोटी रुपये देऊ शकता. परंतु, महाराष्ट्राचा आक्रोश आणि वेदना तुम्हाला कळत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली. बाबा रामदेव यांच्याऐवजी दुसरं कोणी बोललं असतं तर भाजपने रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं असतं, असा टोला त्यांनी हाणला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button