पावसाळी अधिवेशनासाठी शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी
मुंबई : राज्याचे विधिमंडळ अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलैला रोजी घेण्यात येणार आहे. या दरम्यान शिवसेना आमदारांना पूर्ण वेळ अधिवेशनात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या अधिवेशनामध्ये शासकीय मागण्या, पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करणार आहेत. शिवसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला असून सर्व आमदारांना या अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. शिवसेने विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून हा व्हिप जारी करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे.
व्हिप हा पक्षाचा आदेश असतो याला पक्षादेश देखील म्हटलं जाते. आपल्या पक्षातील सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा व्हिप काढला जातो. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची असल्यास व्हिप जारी करण्यात येतो. या व्हिपचे पालन करणं संबंधित पक्षातील आमदाराला बंधनकारक असते. पक्षातील राजकारणी आणि आमदारांना शिस्त लावणे ही या व्हिपची भूमिका आहे. तसेच आमदाराने स्वतःची विचारसरणी बाजूला ठेवून केवळ पक्षाच्या धोरणाप्रमाणे मतदान करण्याचा या व्हिपचा हेतू असतो.
व्हिपच्या विरोधात जर एखाद्या आमदाराने भूमिका घेतली तर त्या सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. शिवाय त्या सदस्यावर पक्षाच्या वतीने कारवाईही करण्यात येऊ शकते आणि पद जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. परंतु अशा प्रकारचा व्हिप काढण्याचा अधिकार केवळ पक्षाकडून निवडून दिलेल्या गटनेत्यालाच असतो.
शिवसेनेकडून काढण्यात आलेल्या व्हिपमध्ये म्हटलंय की, सोमवार दिनांक ५ जुलै २०२१ रोजीपासून महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन विधानभवन, मुंबई येथे सुरु झाले आहे. सदरहू अधिवेशनात सन २०२१-२२ च्या पूरवणी मागण्या, शासकीय कामकाज, पुरवणी विनियोजन, विधेयक यावर चर्चा व मतदान होऊन ते संमत करण्यास येणार आहेत. आता शिवसेना पक्षाच्या सर्व सन्माननीय सदस्यांची अधिवेशन कळाता दररोज संपूर्ण दिवस कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थिती अनिवार्य आहे. असा पक्षादेश आहे. असे या व्हिपमध्ये म्हटलं आहे.