राजकारण

खबरदारी घेऊ, पण यंदा दहीहंडी साजरी करु; मनसेचा सरकारला इशारा

ठाणे : कोरोना संकटामुळे अनेक सण, उत्सवांवर बंदी घालण्याची वेळ सरकारवर आली. दसरा, दिवाळीसारखे सणही अत्यंत साधेपणाने साजरे केले जात आहेत. अशावेळी मनसेनं मात्र दहीहंडी उत्सवासाठी शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत आणि योग्य खबरदारी घेऊन ३१ ऑगस्टला विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे नेते अभिजित पानसे यांनी म्हटलंय.

यंदा ३१ ऑगस्टला दहीहंडी साजरी करणार आहोत. त्यासाठी अनेक मंडळांना आवाहन केलं आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहीहंडी उत्सवात सामील व्हा आणि आपला मराठी सण एकत्र येऊन आनंदाने साजरा करा, असं अभिजित पानसे यांनी म्हटलंय. मनसेच्या या आवाहनामुळे आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि पोलीस या बाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरवर्षी जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. मात्र, मागील वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात मागील वर्षी शुकशुकाट पाहायला मिळाला. तर आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं. मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा जन्म उत्सव पूजा अर्चाकरून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button