…पण महापालिका अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचं काय? मुनगंटीवारांचा खोचक सवाल

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंसोबत झालेला शाब्दिक वाद, त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्य सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या दिमतीला सहा शस्त्रधारी जवान देण्यात आले असून राऊत यांच्या घराला छावणीचं स्वरुपही आलं आहे. राऊतांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेवरुन भाजप नेत्यांनी जोरदार टीका केलीय. राऊतांच्या सुरक्षेत जरुर वाढ करा, पण ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या सुरक्षेचं काय? असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय.
संजय राऊत यांना दहशतवाद्यांकडून धोका असेल तर त्यांच्या सुरक्षेत जरुर वाढ करावी. १०गाड्या पुढे आणि १० गाड्या मागे ठेवा. पण ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या सुरक्षेचं काय? महिला आज सुरक्षित नाहीत. त्याचं उत्तर सरकारनं आधी द्यावं, अशी टीका मुनगंटीवार यांनी केलीय. तसंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जर चहापानासाठी किंवा चाय पे चर्चा करण्यासाठी बोलावलं असेल तर जरुर जावं. पण फक्त १२ आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर ते राज्यपालांच्या भेटीला जात असतील तर ते दुर्दैवी आहे. कारण महाराष्ट्रात एमपीएससीची पद रिक्त आहेत. आरोग्य सेवकांची पदं रिक्त आहे. त्या संदर्भातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घ्यायला हवी, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावलाय.
आशिष शेलार यांनी आज वांद्रे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊत यांच्या सुरक्षेवरून प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना शेलार यांनी हा टोला लगावला. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे चांगले आहे. ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात. त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतंय. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही तर अंतर्गत धोका असावा म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, असा टोला शेलार यांनी लगावला.




