एखाद्या माणसाला ए़खाद्या गोष्टींचा ध्यास लागला असेल, त्याच त्याला सर्वत्र दिसतात. स्वप्नातही त्याच गोष्टी त्याच्या नजरेपुढं नाचतात. आणि त्याच गोष्टी प्रत्यक्षात आल्या, तर काय स्थिती होते, हा पुढच चिंतनाचा विषय. एका लोकप्रिय गाण्यात मनी वसे ते स्वप्नी दिसे असे म्हटले होते. कधी कधी अजाणतेपणे किंवा विनोदानं एखादं वाक्य उच्चारावं आणि ते प्रत्यक्षात यावं, हा काळानं उगवलेला सूडही असू शकतो. गांभीर्यानं घ्यायच्या गोष्टी गांभीर्यानं घ्यायच्या असतात, त्याचा विनोद करायला गेलं, की तो अंगलट येतो. सुपरस्टार शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन याच्याबाबतीत आता ते प्रत्यक्षात घडलं आहे. हेच फळ काय मम तपाला असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मुळात योग्य मार्गानं पैसे कमविणं पाप नाही; परंतु वडीलांनी कष्टानं कमविलेल्या पैशाची किंमत न कळणं आणि ते व्यवसनांवर उडविणं हे पाप आहे. बड्या बापाची मुलं अशीच बिघडलेली निघतात, व्यसनांच्या आहारी जातात. पैसा फेकला, की आपलं कर्तव्य संपलं, असं मानणारे बाप असल्याशिवाय दुसरं काही होत नाही. शाहरूख यांचा मुलगा क्रूझ पार्टीत पक़डला गेल्यानं तो बातमीचा विषय झाला असला, तरी यापूर्वी अशी बर्याच बापांची मुलं अंमली पदार्थांच्या आहारी गेलेली उदाहरणे आहेत. पुण्यातही विश्वासराव नांगरे पाटील यांनी रेव्ह पार्टीचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यातही एका मराठी अभिनेत्रीसह बड्या धेंडाची मुलं आढळली होती. शाहरूख यांच्या मुलाला अटक केल्यानंतर त्यांच्या २४ वर्षांपूर्वीच्या वक्तव्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. शाहरुख सिमी ग्रेवालच्या शोला १९९७ मध्ये पत्नी गौरी खानसोबत गेले होते. या दरम्यान, शाहरुख यांनी गमतीनं म्हटलं होतं, की त्याच्या मुलाने त्या सर्व वाईट गोष्टी केल्या पाहिजेत, जे तो तरुणपणात करू शकत नव्हता. शाहरुख म्हणाला होता, ’ माझ्या मुलाने मुलींना डेट करायचे मला पाहायचे आहे, त्याने सेक्स आणि ड्रग्जचाही आनंद घ्यायचा आहे. तो एक वाईट मुलगा बनला पाहिजे. आणि जर तो एका चांगल्या मुलासारखा दिसू लागला तर मी त्याला घराबाहेर फेकून देईन. ’ शाहरुख खान यांनी विनोदी पद्धतीनं सांगितलेली तीच प्रत्यक्षात आल्यानं आता ती सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.
अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं आर्यन खानचा फोन जप्त केला. आर्यनला क्रूज ड्रग्स पार्टीमध्ये सहभागी असल्याबद्दल एनसीबीने ताब्यात घेतले. आर्यनसह एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये तीन मुली आहेत. या प्रकरणात एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमीचा, नुपूर सारिका, इश्मीत सिंग, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा, मोहक जसवाल यांची चौकशी केली होती. दिल्लीच्या एका बड्या उद्योगपतीची मुलगीही यात सामील असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्या क्रूझवर एनसीबीने केलेल्या छाप्यांमध्ये हॅशिश, एमडी, कोकेनची मोठी मात्रा सापडली आहे. तीन दिवसांपूर्वी एनसीबीला या ड्रग्स पार्टीची माहिती मिळाली. या पार्टीत सामील होण्यासाठी ८० हजार ते पाच लाख रुपये आकारण्यात आल्याचे उघड झाले. या माहितीच्या आधारे, एनसीबीचे काही अधिकारी पार्टीत सामील होण्याच्या बहाण्याने क्रूझमध्ये दाखल झाले. आतील दृश्य पाहिल्यानंतर या टीमने बाहेर बसलेल्या अधिकार्यांना माहिती दिली. यानंतर एनसीबीच्या टीमने शनिवारी रात्री छापा टाकला. या घटनेचा परिणाम शाहरूख खान यांच्या व्यावसायिक जीवनावरही झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरूख खान आपल्या आगामी पठाण या चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्पेनला रवाना होणार होता. स्पेनमध्ये शाहरूख आणि दीपिका पादुकोण यांच्या गाण्याची शूटिंग आयोजित करण्यात आली होती; परंतु आर्यन खानला झालेल्या अटकेमुळं शाहरूख खान आपली शूटिंग लांबणीवर टाकण्याची किंवा रद्द करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्यनचा मित्र अरबाज सेठ मर्चंट याचे अमली पदार्थांशी जास्त जवळचे नाते असल्याचे बोलले जात आहे. आर्यन खान नेहमीच आपले खासगी आयुष्य एकांतात जगणे पसंत करतो. चित्रपटसृष्टीत होणार्या मोठ्या पार्ट्यांमध्ये आर्यनचा खूपच कमी सहभाग असतो. त्यामुळे क्रूझवर सुरू असलेल्या पार्टीत आर्यन खानचे नाव समोर आल्यामुळे बॉलिवूडसह त्याचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. ड्रग्जचं सेवन सुरू केल्यानंतर एनसीबीच्या पथकानं या सर्वांना रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी कारवाई केलेली क्रूझ काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. आर्यनचा याप्रकरणात थेट समावेश होता की नाही, त्याने ड्रग्स खरेदी केले होते का यासंदर्भात तपास सुरू आहे.
मोठ्या वलयांकित कलाकारांची मुलंमुली ड्रग्ज केसमध्ये अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. बॉलीवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये ड्रग्जसंदर्भात शंकास्पद परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकवेळा अशी प्रकरणं समोरही आली आहेत; मात्र या तपासातून काहीच निष्पन्न झालं नाही. चित्रपटसृष्टीतल्या काही मंडळींना ड्रग्ज सेवनासाठी तुरुंगात जावं लागलं आहे तर काहींना ड्रग्जच्या विळख्यातून सुटण्यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटरचा आधार घ्यावा लागला आहे. मोठ्या कलाकारांच्या मुलांचा विषय निघतो तेव्हा सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्तचा उल्लेख येतो. आई नर्गिस दत्त यांचं निधन झाल्यानंतर संजय यांचं ड्रग्जसेवनाचं प्रमाण वाढलं होतं. ड्रग्जच्या विळख्यातून सुटका व्हावी यासाठी सुनील दत्त यांनी संजयला अमेरिकेतील रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवलं होतं. तिथून ठीक होऊन परतल्यानंतर संजयने चित्रपटांमध्ये पुनरागमन केलं. अभिनेत फिरोझ खान यांचा मुलगा फरदीन खानला २००१ मध्ये मुंबई पोलिसांनी ड्रग्जसह पकडलं होतं. चित्रपटात चांगलं यश मिळत असताना फरदीनला ड्रग्सची सवय लागली होती. यातून सुटका होण्यासाठी फरदीनला प्रदीर्घ अशी कायदेशीर लढाई लढावी लागली.
रिहॅबलिशेन सेंटरच्या माध्यमातून उपचार घेतल्यानंतर त्याने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली होती. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने ड्रग्जच्या सवयीबद्दल सांगितलं होतं. त्याची बिघडणारी अवस्था पाहून त्याला रिहॅब सेंटरमध्ये नेण्यात आलं. तिथे त्याच्या सवयीवर उपचार करण्यात आले, त्यानंतरची ड्रग्जची सवय सुटली. प्रतीक आता सुरळीत आयुष्य जगत आहे आणि चित्रपटांमध्येही त्याने पुनरागमन केलं आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा आणि बिग बॉस स्पर्धेतील सहभागामुळे चर्चेत राहुल महाजन ड्रग्जप्रकरणी वादाच्या भोवर्यात सापडला होता. त्याच्यावर ड्रग्जसेवनाचा आरोप होता आणि त्यासाठी त्याला तुरुंगातही जावं लागलं. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती ढासळली आणि गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राहुलने सर्व आरोप फेटाळले होते.
अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि खलनायकाच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर यांची नावं ड्रग्जप्रकरणी समोर आली होती. सुशांत राजपूतच्या ड्रग्जसंदर्भातील प्रकरणाची एनसीबीकडून चौकशी सुरू असताना सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्यासह रकुलप्रीतसिंह आणि दीपिका पदुकोणचं नाव समोर आलं होतं. आताच्या क्रूझवर सहभागी लोकांनी आपल्या पँटच्या शिलाईमध्ये, महिलांच्या पर्सच्या हँडलमध्ये, अंडवेअरच्या शिलाईच्या भागात आणि कॉलरच्या शिलाईत ड्रग्ज लपवल्याचं समोर आलं आहे. दोन हजार प्रवासी क्षमता असलेल्या या क्रूझमध्ये एक हजारांहून कमी लोक प्रवास करत होते. पार्टीचं निमंत्रण इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरून देण्यात आलं होतं. त्यासाठी काही लोकांना विशेष आकर्षक किट भेट देऊन निमंत्रित करण्यात आलं होतं. या क्रूझ शिपवर आलेले बहुतांश लोक दिल्ली येथील होते. विमानातून ते मुंबईला आले आणि नंतर क्रूझवर गेले होते.