कोलकाता – पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठी फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ७४ पैकी केवळ ५१ भाजप आमदारच राजभवनात जाऊ शकले. या संपूर्ण घटनेने पश्चिम बंगाल भाजपमध्ये बंडखोरीचे संकेत मिळत आहेत.
सुवेंदू अधिकारी, राज्यातील निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचारासंदर्भात राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेले एकूण ५१ आमदारही होते. मात्र, विधानसभेत भाजपच्या एकूण आमदारांची संख्या ७४ आहे. या आमदारांनी हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात राज्यपालांना निवेदन दिले आहे. यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, तृणमूल काँग्रेसमधून भाजपत आलेले अनेक नेते, पुन्हा टीएमसीत जात असतानाच हा प्रकार घडला आहे.
तृणमूल काँग्रेस सोडून भाजपत गेलेले मुकूल रॉय नुकतेच पुन्हा ममता बॅनर्जींसोबत गेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे आणखी काही नेते तृणमूलच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. एकूण परिस्थिती पाहता, भाजपचे अनेक आमदार पुन्हा तृणमूलमध्ये जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, सुवेंदूंसोबत न गेलेल्या नेत्यांसंदर्भात अद्याप भाजपने कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.