
उस्मानाबाद : राज्यपाल यांनी काही भाषण केलं. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केलं. त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही. मुळात पद आणि अधिकार याचे तारतम्य राहत नसल्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली.
शरद पवार यांच्या हस्ते आज उस्मानाबाद तालुक्यात विविध विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज व सावत्री बाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल आहे. पण त्यांनी दोन कार्यक्रमात वक्तव्य केलं. मुळात पद आणि अधिकार याचे तारतम्य नसल्याने त्यांच्याकडून अशी विधानं होतात, अशा शब्दांत शरद पवार यांनी कोश्यारी यांच्यावर नाव न घेता टीका केली. राज्यपालांनी अशी वक्तव्यं केल्यानंतर कोण तुम्हाला विचारणार आहे, लोक म्हणतात यांच्या नादाला न लागणे बरे, असा टोलाही पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांना लगावला.
तसंच, काही लोकांना सत्ता गेल्यापासून करमत नाही निवडणूक निकाल लागण्याआधीच मी येणार मी येणार, असे सांगत होते पण त्यांना आम्ही काय येऊ देतो का, अशी मिश्किल टीका पवार यांनी हातवारे करत विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्यावर केली. राज्यातील आघाडी सरकार हे देशातील इतर राज्यांपेक्षा चांगले काम करत आहे, असं कौतुकही पवारांनी महाविकास आघाडी सरकारचं केलं.
उद्धव ठाकरे चांगला राज्य कारभार चालवत आहेत, असं शरद पवार म्हणाले. सतत ५२ वर्ष काम करण्याची संधी मला दिली. त्या समाजाचे आणि लोकांच्या भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझी आहे. चार चार वेळा मुख्यमंत्री केलं. ८२ वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही मी कधीच थकणार नाही, असं शरद पवार म्हणाले. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला जे सोडून गेले ते सोडून गेले त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असं म्हटलं.
रशिया आणि युक्रेन मधील संघर्ष सुरु आहे. तेथील विद्यार्थ्यांशी माझा संपर्क आहे, जेव्हा डॉक्टर होण्याची वेळ येते तेव्हा लोक युक्रेन सारख्या देशात जातात तेथे आपली हजारो मुलं आहेत. आठ आठ दिवसांपासून ते भुयारात बसलेत, बाहेर पडता येत नाही. केंद्र सरकारने काही पावलं टाकली आहेत तेथे आम्ही सोबत आहोत तेथे आम्ही राजकारण आणणार नाहीत. तेथील मुलांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. ज्या वेळेस युद्ध थांबेल तेव्हा मोठ्या संकटाला आपल्याला तोंड द्यावे लागेल ते म्हणजे महागाई आहे. त्या संकटाला तोंड आपल्याला द्यायच आहे या संकटाला महाराष्ट्र सरकार तोंड देईल ही मला खात्री आहे, असं शरद पवार म्हणाले. संकट येईल तेव्हा राजकारण आणायचं नाही, असंही ते म्हणाले.
नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक यश राष्ट्रवादीला मिळाले आहे. तरी देखील भाजपचा माज काही केल्या उतरत नाही. भल्या भल्याच्या वर ईडीच्या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप करत ईडीची किंमत शेतकऱ्याच्या बिडी सारखी झाल्याची टीका केली आहे, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
…तर पुण्यात पुरस्थिती निर्माण होईल! मोदींनी उद्घाटन केलेल्या नदी सुधार प्रकल्पावर आक्षेप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकल्पावर आक्षेप घेतला आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील नद्यांचं रुपडं बदलून जाईल असा दावा भाजपकडून केला जात आहे. मात्र, या प्रकल्पामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण होईल, अशी भीती राष्ट्रवादीकडून व्यक्त होत आहे.
पुण्याच्या मध्यवर्ती भागातून मुठा आणि मुळा या दोन नद्या वाहत आहेत. या नद्यांचं साध्याचं प्रदूषित आणि ओंगळवाणे रूप पालटून त्या स्वच्छ व्हाव्यात यासाठी नदी सुधार प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी गुजरात मधील साबरमतीच्या धर्तीवर पुण्यातील मुठा आणि मुळा या नद्याही चकचकीत होतील असं म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याच्या आधीच शरद पवार यांनी या नदीसुधारणा प्रकल्पाला जोरदार आक्षेप घेतला आहे. हा प्रकल्प अंमलात आल्यास पुण्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
नदी सुधार हा प्रकल्प पाच हजार कोटींचा असून ११ टप्प्यांमध्ये तो राबवण्यात येणार आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत नद्यांच्या काठांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून गुजरातमधील साबरमतीच्या धरतीवर नदी पात्रात कायमस्वरूपी पाणी राहील याची सोय करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सध्या सुरु असलेले नदी पात्रातील रस्ते बंद करण्यात येणार असून नदीच्या दोन्ही बाजुंच्या खासगी जमिनी देखील अधिग्रहित कराव्या लागणार आहेत.
पाच हजार कोटींची ही योजना महापालिका राबवणार असून त्यासाठी केंद्र सरकार निधी पुरवणार आहे. मात्र, त्यासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. हाच धागा पकडत शरद पवार यांनी आपण जयंत पाटील यांच्याकडे असलेल्या जलसंपदा विभागाकडूनही याबाबत माहिती घेऊ असं म्हटलंय. या प्रकल्पावरून राजकीय कलगीतुरा रंगलेला असताना पर्यावरण अभ्यासकांनी देखील या प्रकल्पामुळे पुण्यात सातत्याने पूरस्थिती निर्माण होईल असं म्हटलंय.
दरम्यान, या प्रकल्पाबरोबरच पुण्यात जायकाच्या माध्यमातून मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जपानच्या जायका कंपनीने एक हजार कोटींचे अनुदान २०१५ मध्ये देऊ केलं होतं. परंतु, मागील सात वर्षांमध्ये हा प्रकल्प सुरूच न झाल्याने त्याची किंमत वाढून चौदाशे कोटींवर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकल्पाचंही आज उद्घाटन केलं आहे. परंतु, यावरून सुरु झालेलं राजकारण पाहता हे प्रकल्प खरच पूर्ण होतील का? आणि झाले तर, कधी होतील? असा प्रश्न पुणेकरांच्या मनात निर्माण होत आहे.