नवी दिल्ली : देशात एकीकडे ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना दुसरीकडे कोरोनाशी सुरू असलेला लढा देखील सुरू आहे. अजूनही देशात करोनावर नियंत्रण येऊ शकलेलं नसून करोनाचे नवनवे व्हेरिएंट आरोग्य यंत्रणेची चिंता अधिक वाढवली आहे. देशभरात दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसऱ्या लाटेची टांगती तलवार सरकार आणि देशवासीयांच्या मानेवर आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना देशाच्या कोरोना लढ्याविषयी आपली भूमिका मांडली. यावेळी कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शास्त्रज्ञ-वैज्ञानिकांसोबतच आरोग्य सेवकांचं देखील त्यांनी कौतुक केलं. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी एक दु:ख कायम आपल्यासोबत राहील, असं म्हटलं आहे. दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विकासाचे नवे शिखर गाठू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Prime Minister Narendra Modi hoists the National Flag from the ramparts of Red Fort to celebrate the 75th Independence Day pic.twitter.com/0c3tZ6HQ3X
— ANI (@ANI) August 15, 2021
आपल्या भाषणच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडुंचे स्वागत केले. या खेळाडुंनी केवळ आपली मनं जिंकलेली नाहीत तर त्यांनी भविष्यातील नव्या पिढीली प्रेरणा दिली आहे. त्यासाठी आपण त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करुयात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना करोनामुळे प्राण गमावेल्या देशवासीयांसाठी शोक व्यक्त केला. इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी लोकांना करोनाची लागण झाली. जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत आपण जास्त प्रमाणात आपल्या नागरिकांना वाचवू शकलो. पण हा आपल्यासाठी पाठ थोपटून घेण्याचा विषय नाही. आनंद मानण्याचा विषय नाही. काही आव्हानच नव्हतं, असं म्हणणं आपल्या विकासाच्या वाटा अडवणारा विचार ठरेल. कितीतरी लोकांना आपण वाचवू शकलो नाही. कितीतरी मुलं अनाथ झाली. ही असह्य पीडा नेहमीच सोबत राहणार आहे. आपल्या देशात जर आपली करोनाची लस नसती, तर काय झालं असतं? जगभरात करोनाचं संकट असताना आपल्याला लस कधी मिळाली असती? पण देशाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर आपल्याला लसीसाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याची वेळ आलेली नाही, असं मोदी यावेळी म्हणाले.
Delhi | PM Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat on the 75th Independence Day
(Photo source: DD News) pic.twitter.com/n9sybFSV1f
— ANI (@ANI) August 15, 2021
दोन महत्त्वाच्या योजनांची घोषणा
देशातील दळणवळण आणि प्रवास वेगवान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दोन नव्या योजनांची घोषणा केली. त्यानुसार येत्या ७५ आठवड्यात रेल्वे विभागाकडून ७५ वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येतील. या ट्रेन्स भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन संपूर्ण देश जोडतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
देशातील दळवळण वेगवान करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी गतीशक्ती योजनेची घोषणा केली. देशातील पायाभूत सुविधा या आणखी बळकट केल्या पाहिजेत. दळणवळणासाठी गतीशक्ती ही खास योजना असेल. जेणेकरून सामान्य माणसांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. त्यामुळे लोकांची आणि उद्योगांची कार्यक्षमता वाढेल. या सगळ्यामुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरील स्पर्धेला तोंड देणे शक्य होईल. आगामी काळात देशाचा विकास करायचा असेल तर उत्पादन क्षमता आणि निर्यात वाढवावी लागेल. भारतातील उत्पादकांनी त्यांचे उत्पादन भारताची ओळख असल्याचं लक्षात ठेवावं. जगाच्या बाजारपेठेवर आपलं अधिराज्य असावं हे स्वप्न देशातील उत्पादकांनी पाहावं. सरकार त्यांच्यासोबत ठामपणे उभे असेल, असेही मोदींनी सांगितले.
By conducting surgical strikes and airstrikes, we have given a message of the emergence of a new India to our enemies. It also conveys that India can take tough decisions: PM Modi from the ramparts of Red Fort on Independence Day pic.twitter.com/fr238mgq38
— ANI (@ANI) August 15, 2021
‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘सबका प्रयास’
लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी घोषणा दिली. आजपर्यंत आपण ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या धोरणानुसार चालत होतो. मात्र, आता बदलती परिस्थिती पाहता ‘सबका प्रयास’ हा आणखी एक घटक त्यामध्ये जोडावा लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. भारताच्या १०० व्या स्वातंत्र्यदिनासाठी आपण आतापासूनच काही संकल्प केले पाहिजेत. बदलत्या युगानुसार नागरिकांनीही स्वत:मध्ये बदल केले पाहिजेत. भारताचा १०० वा स्वातंत्र्यदिन साजरा होईल तेव्हा देश पायाभूत सुविधा आणि अन्य सुविधांच्याबाबत पुढारलेला असला पाहिजे. विकासाची गंगा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. हा विकास सर्वांगीण आणि सर्वस्पर्शी असावा. सरकारला विनाकारण नागरिकांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला लागू नये, असा संकल्पही आपण करुयात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे
– देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना, स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांना नमन. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना देश आठवत आहे. या सर्वांना वंदन करतो.
– देशात पूर आणि भूस्खलनाच्या दुर्दैवी घटना घडल्यात. या घटनांमध्ये प्रभावित सर्वांसोबत केंद्र सरकार उभं आहे.
– उज्वला योजनेपासून आयुष्मानपर्यंत योजनांची ताकद सर्वसामान्यांना माहिती आहे. मात्र, इतक्यावरच थांबायचं नाहीये. १०० टक्के गावांमध्ये रस्ते असावेत, सर्वांकडे बँक खाते असावेत, सर्वांकडे आयुष्मान कार्ड असावे, घरकुल योजनेतून प्रत्येक हक्काच्या व्यक्तीला घर द्यायचं आहे.
– जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होतील. जम्मू काश्मीरमध्ये डिलिमिटेशन बोर्डाचं गठन झालंय, त्यामुळे लवकरच तिथं विधानसभा निवडणुका होतील. लडाखमध्येही विकासाची कामं सुरु आहेत. सिंधू सेंट्रल युनिव्हर्सिटी लडाखला महत्व मिळवून देईल.
– मी कर्मावर विश्वास ठेवतो. माझा देशातील तरुणांवर, शेतकरी सर्वांवर विश्वास आहे. प्रत्येक लक्ष्य ते संपादन करु शकतात.आजपासून २५ वर्षांनी २०४७ मध्ये जेव्हा १०० वर्ष पूर्ण होतील तेव्हा जे कोणी पंतप्रधान असतील ते आपल्या ते भाषणात ज्याचा उल्लेख करतील तो संकल्प आज देश करत आहे. हा माझा विश्वास आहे. २५ वर्षानंतर ध्वजारोहण करताना हीच गौरवगाथा गायला जाईल.
– मला अनेक मुलींनी सैनिक स्कूलमध्ये शिक्षण मिळावं यासाठी विनंती केली. आम्ही मिझोरममध्ये प्रयोग केला होता. पण आता देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला असून आता मुलीही तिथे शिक्षण घेणार.
– देशातील प्रत्येकापर्यंत चांगल्या आरोग्याची व्यवस्था पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी आयुष्मान भारत योजनेत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहचवल्या जात आहेत, नागरिकांना स्वस्त औषधं उपलब्ध करुन दिले जात आहे. आता ब्लॉक स्तरावर आधुनिक रुग्णालयं उभे करण्यावर भर दिला जात आहे. पुढील काळात रुग्णालयांकडे स्वतःचे ऑक्सिजन प्लांट असतील.
– देशात भांडवलशाही आणि समाजवादाची खूप चर्चा होते. पण देशात सहकारवादाचीही गरज आहे. यामुळे देशातील जनता विकासाचा भाग बनावा म्हणून सहकार क्षेत्र महत्त्वाचं आहे. सहकार हे एक संस्कार, प्रेरणा आणि सोबत चालण्याची वृत्ती आहे. म्हणूनच स्वतंत्र सहकार मंत्रालय बनवण्यात आलं.
– वाढत्या लोकसंख्यामुळे कुटुंबात विभागणी होऊन गावांमध्ये शेतकऱ्यांकडील जमिनीचं प्रमाण कमी होतंय. हे मोठं आव्हान आहे. सध्या देशात 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे जितकं लक्ष द्यायला हवं होतं तितकं आधी दिलं गेलं नाही. आत्ता या शेतकऱ्यांवर लक्ष दिलं जातंय.
– देशातील लोकांना आता अनावश्यक कायदे, प्रक्रियेतून मुक्ती मिळावी यासाठी गेले सात वर्ष प्रयत्न झाले. करोना संकटातही सरकारने १५ हजाराहून अधिक अडथळे आम्ही दूर केले. करप्रकियाही सहज करण्यात आली आहे. या सुधारणा ग्रामपंचायत, नगरपालिकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.
– भारताला उत्पादन आणि निर्यात वाढवावी लागणार आहे. भारत आज लढाऊ विमानाची निर्मिती करत आहे. आज आपण तीन बिलियन डॉलर्सचे फोन निर्यात करत आहोत. भारताने स्वदेशची निर्मिती करताना जागतिक बाजाराला टार्गेट करायचं आहे.
– सहकारवाद ही आपली प्रेरणा आहे. सहकारवाद आपल्या परंपरेचा अविभाज्य घटक आहे. सहकारवादाचं सशक्तीकरण व्हावं म्हणून विशेष मंत्रालय तयार करण्यात आलं आहे. सहकार क्षेत्राला जास्तीत जास्त बळ देण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं आहे.