आरोग्य

दिल्लीत विकेंड कर्फ्यू; अरविंद केजरीवालांची घोषणा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्लीत विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विकेंड कर्फ्यू लावत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. केजरीवाल यांनी राज्यातील जनतेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्वाच्या गोष्टींना कर्फ्यू पासच्या माध्यमातून परवानगी असेल असं केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

कर्फ्यूमध्ये सभागृह, मॉल, जीम आणि स्पा बंद असणार आहेत. तर चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसंच बाहेर जेवण्याला बंदी असून होम डिलिव्हरीची परवानगी आहे. आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना निर्बंधाचं पालन करावं लागेल. कर्फ्यूमध्ये लग्नासाठी जाणाऱ्यांना ई-पास दिला जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. हे सर्व निर्बंध तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहेत. यामुळे थोडी अडचण होईल पण करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध गरजेचे आहेत, असं अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी लोकांना न घाबरण्याचं आवाहन करताना वीकेण्डला अत्यावश्यक सर्व सेवा सुरु राहतील असं सांगितलं आहे.

नायब राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीनंतर अरविंद केजरीवाल यांनी विकेंड कर्फ्यूची घोषणा केली. दिल्लीमध्ये करोना रुग्णांसाठी बेडची कमतरता नसल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच सार्वजनिक ठिकाणी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

दिल्लीत बुधवारी सर्वाधिक १७ हजार २८२ नव्या रुग्णांची नोंद झाली. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा उच्चाकं दिल्लीसाठी चिंतेची बाब असून करोनाच्या दुसऱ्या लाटेचा राज्याला फटका बसला आहे. बुधवारी १०० रुग्णांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा दर १२.४ वरुन १६ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिल्लीत सध्याच्या घडीला ५० हजार ७३६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button