आरोग्य

राज्य सरकारला रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यास कंपन्यांचा नकार!

मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दुसरीकडे रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनला तुटवडा सुद्धा जाणवू लागला आहे. अशातच राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. ८.५० लाख रेमडेसीवीर खरेदी टेंडर पुढे ढकलण्यात आली आहे. इंजेक्शनचा पुरवठा करण्यास कोणताही पुरवठादार तयार नाही.

राज्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने इंजेक्शन खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. पण पुरवठादारांनी इंजेक्शन देण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारला ६५४ रुपये दराने रेमडेसीवीर इंजेक्शन हवे आहे. पण खुल्या बाजारात बाराशे रुपये किंमत असताना कंपनी सरकारला रेमडेसीवीर द्यायला इच्छुक नाहीत. राज्य सरकारने ज्या दरात मागणी केली आहे, त्या दरात द्यायला कंपन्या तयार नाहीत म्हणून १२०० रुपयांना इंजेक्शन घ्या, अशी भूमिका कंपन्यांनी घेतली आहे. कच्या मालाचे भाव वाढले आहे, त्यामुळे कमी दरात देणे शक्य नाही, असंही कंपन्यांनी सांगितलं.

बाजारात आम्ही १२०० रुपयांना विकतो तर सरकारला कमी दरात कसे देणार, आता उत्पादन कमी आहे जेंव्हा ६६० रुपये दराने दिला. त्यावेळी कंपनीकडे साठा पडून होता, असंही या कंपन्यांचं म्हणणं आहे. एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपन्यांना देशांतर्गत विक्रीस मुभा मिळाली आहे. त्यामुळे या कंपन्या टेंडरमध्ये सहभागी होऊ शकला नाहीत. त्यामुळे टेंडरला पुन्हा ३ दिवस मुदतवाढ द्यावी लागली आहे. रेमडेसीवीरचा पुरवठा आणखी लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे आगामी काळात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा आणखी निर्माण होण्याचे चिन्ह आहे.

पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा कायम

राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना कोरोना बाधित रुग्णांवर प्रभावी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आज रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा झालेला नाही. रेमडेसिवीरची निर्मिती करणाऱ्या प्रमुख सात कंपन्या आहेत. त्यातील महत्वाची हेटरो लॅब लिमिटेड या हैदराबाद स्थित कंपनीचा हैदराबादमधील प्लांट बंद असल्याने या कंपनीकडून रेमडेसिवीरचा पुरवठाच बंद करण्यात आलाय. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे.

हेटरो लॅब लिमिटेड या हैदराबाद स्थित कंपनीकडून अर्ध्याहून अधिक रेमडेसिवीरचा पुरवठा केला जातो. एकटी हेटरो कंपनी दररोज 35 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचे उत्पादन करते तर उरलेल्या सहा कंपन्या मिळून 30 हजार इंजेक्शन्स तयार करतात. मात्र, मागील दोन दिवसांपासून हेटरो कंपनीचा हैदराबादमधील प्लांट बंद असल्याने या कंपनीकडून रेमडेसिवीरचा पुरवठाच बंद करण्यात आलाय.

बुधवारी देखील या कंपनीकडून पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा झाला नव्हता. इतर सहा कंपन्यांकडून होणाऱ्या आणि त्यातील महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचं प्रमाण नगण्य आहे. पुण्यात निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे पुण्याचे जिहाधिकारी राजेश देशमुख यांनी पाठपुरावा करून ज्या कंपनीचा सरकारबरोबर रेमडेसिवीर पुरवण्याचा करार आहे, त्या कंपनीकडून तीन हजार इंजेक्शन बुधवारी पुण्यासाठी मिळवली. मात्र, हेटरो लॅब या सर्वात मोठ्या कंपनीचा पुरवठा मात्र बंद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button