
पनवेल : अभिनेता सलमान खानला सर्पदंश झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी रात्री घडली. पनवेल कामोठे येथील एमजीएम मध्ये दाखल करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील वाजेपूर याठिकाणी सलमान खानचे अर्पिता फार्म म्हणून फार्म हाऊस आहे. याठिकाणी ही घटना घडली. साप बिनविषारी असल्याने प्राथमिक उपचार करून सलमान खानला एमजीएममधून सोडून देण्यात आले.
सलमान खानला शनिवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास एमजीएम रुग्णालय कामोठे याठिकाणी दाखल करण्यात आले होते. यावेळी सलमानला प्राथमिक उपचार देण्यात आले. यावेळी एमजीएमचे डॉक्टर सलमानवर लक्ष ठेवून होते. सकाळी ९ च्या सुमारास सलमान खानला सोडून देण्यात आल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ सुधीर कदम यांनी दिली. सलमान एमजीएम रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय पथक यांच्यासोबत त्याच्या पनवेलमधील वाजेपूर येथील अर्पिता फार्म याठिकाणी थांबले आहे. यावेळी एक सर्व सोयी सुविधायुक्त अॅम्ब्युलन्स देखील एमजीएम रुग्णालयाच्यावतीने फार्मवर ठेवण्यात आली असल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली आहे.
सलमान खान पनवेल फार्म हाऊसवर मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत होता. त्यांच्याशी बोलत असताना, त्याच्या लक्षात आलं, की आपल्या हाताला काहीतरी टोचतंय. त्यानं इकडे-तिकडे नजर फिरवली तेव्हा त्याला साप दिसला. सापाला पाहून सलमान खान घाबरला आणि त्यानं लगेच मदतीसाठी आरडाओरडा सुरू केली. रात्री साडे तीन वाजताच ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सुमारे ६ ते ७ तास रुग्णालयात राहिल्यानंतर सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
सलमान खानचं फार्म हाऊस खूप मोठं आहे, त्याच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. त्याला याआधीही फार्म हाऊसजवळ साप दिसला होता. फार्म हाऊसच्या केअरटेकरनाही काळजी घेण्याच्या सूचना त्यानं आधी केल्या होत्या. मात्र सापानं त्याला दंश केलाच. सुदैवानं हा साप विषारी नव्हता. दरम्यान, आता सलमान धोक्याबाहेर असून त्याला बरं वाटत आहे.




