ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी ४ रुग्णांचा मृत्यू
ठाणे : वर्तकनगर परिसरामधील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केलेल्या ४ रुग्णांचा १२ तासांमध्ये टप्प्याटप्प्याने मृत्यू झाला आहे. यावेळी मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी त्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या अभावी झाल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यामुळे हॉस्पिटलच्या बाहेर तणावाचे वातावरण पसरल्याने ठाणे शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, राजकीय नेतेमंडळी आणि महापालिकेच्या अधिकार्यांनी रुग्णालयात धाव घेत, रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती घेतली. त्यातच हॉस्पिटल प्रशासनाने सहा जणांचा नाहीतर चौघांचा मृत्यू झाला असून तो ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी भाजपने मृत रुग्णांच्या नातेवाईकांकडून कोणतेही बिल घेऊ नये अशी मागणी केली.
वर्तकनगर येथील वेदांत या खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचा मेसेज सोशल मीडिया वार्यासारखा व्हायरल झाला. मृत रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाल्याने हे प्रकरण वाढू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. रात्री आमचे डॉक्टरांशी बोलल्यानंतर डॉक्टर बोलले पीपीई किट्स घालून आम्हाला भेटण्यासाठी परवानगी देईल असे सांगण्यात आले. दरम्यान सकाळी अचानक मृत्यू झाला असल्याचे आम्हाला सांगण्यात आले असून ऑक्सिजनअभावीच मृत्यू झाला असल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईक साधना पाटील यांनी केला आहे. दरम्यान मृत रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता.
कोणी माझे नातेवाईक रात्री चांगले होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हल ९७ एवढी होती. तर आणखी कोणी रात्री माझे नातेवाईक माझ्याशी बोलले, जेवले देखील, तसेच कोणी त्यांच्या रुग्णाची पाठ दुखत होती, म्हणून त्यांना बाम देखील लावण्यात आला असे रडून सांगत होते. असे असताना अचानक हॉस्पिटल प्रशासनाकडून आम्हाला तुमच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, सकाळपासून विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी रुग्णालयात येऊन परिस्थितीची माहिती घेतली. यामध्ये गृहनिर्माण मंत्री, आमदार, माजी खासदार, नगरसेवक आणि पालकमंत्री यांच्यासह महापालिका आयुक्तांचा समावेश आहे.
दरम्यान, नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी सहा जणांची एक उच्चस्तरीय समिती गठीत केली असून त्यांना अहवाल सादर करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामध्ये कोणालाही पाठीशी न घालता, त्या अहवालानुसार जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.