काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का?; प्रसाद लाड यांचा शिवसेनेवर पलटवार
मुंबई : मराठी माणूस पराभूत झाला म्हणून पेढे कसले वाटता? लाज वाटत नाही का, असा हल्लाबोल खा. संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर केला होता. यावरून आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर पलटवार केला असून, हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का, अशी विचारणा केली आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला होता. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर नाव न घेता टीका केली होती. बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसे गेली अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला होता. याला आता भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेसने सातत्याने मराठी माणूस आणि हिंदुत्वाला सातत्याने विरोध केला. त्या काँग्रेसशी हातमिळवणी करून पेढे वाटताना लाज वाटली नव्हती का, असा थेट सवाल केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
बेळगावचा विजय हिंदुत्वाचा विजय आहे. बेळगावचा विजय मराठी माणसांचा विजय आहे. बेळगावचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय आहे. भाजपला हिंदुत्वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि मराठी माणसांचा कधी विसर पडणार नाही. बेळगावचा पराभव संजय राऊत यांच्या जिव्हारी लागला आहे. मला एकच गोष्ट संजय राऊतांना विचारायची की, ज्या मराठी माणसाचा आणि हिंदुत्वाचा काँग्रेसने सातत्याने विरोध केला. त्या काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून पेढे वाटताना त्यांना लाज वाटली नाही का? काँग्रेसशी हात मिळवणून करून त्यानी हिंदुत्वाचा अपमान केला नाही का?, अशी विचारणा लाड यांनी केली आहे.