
मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे पद रिक्त होते. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना एकीकडे वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होतं. त्यामुळं विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात होती. यापूर्वी विजया रहाटकर या महिला आयोगाचे अध्यक्ष होत्या.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळे आणि विविध शासकीय पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त होतं, त्यामुळं आता चाकणकर यांची महिला अध्यक्ष पदी वर्णी लागणार आहे. तसंच अन्य महामंडळावरील नियुक्त्याही सरकारकडून लवकरच केल्या जाणार असल्याचे समजते.
गेल्या काही महिन्यात महिला अत्याचाराच्या व सामूहिक अत्याचाराच्या घटना पुढे आल्या. त्यामुळे महाविकास आघाडीवर टीका होत आहे. त्यात राज्य महिला आयोगाच्या नियुक्त्यांचा मुद्दाही प्रामुख्याने पुढे आला आहे. त्यामुळे चाकणकर यांची नियुक्ती केली जाणार असून त्यावर महाविकास आघाडीत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.




