पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यात ३५ जागांसाठी आज मतदान
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आज विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान होत आहे. आज ३५ मतदारसंघांसाठी मतदान होत असून २८३ उमेदवार रिंगणात आहेत. ८४ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचे बीरभूम जिल्ह्याचे अध्यक्ष अनुब्रत मंडल यांना देखरेखीखाली ठेवलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ते आयोगाच्या देखरेखीखाली असतील. कारण मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्याविरोधात काही तक्रारी आल्या आहेत, असं आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. निवडणुकीच्या आधीच्या टप्प्यांमध्ये हिंसाचारात खासकरून चौथ्या टप्प्यात कूचबिहारमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आजच्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यात स्वतंत्र आणि निष्पक्ष मतदान होण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या ६४१ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यातील २२४ कंपन्या या बीरभूम जिल्ह्यात तैनात आहेत.