Top Newsस्पोर्ट्स

विराट कोहलीचा कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा; द.आफ्रिकेतील पराभवानंतर निर्णय

केपटाऊन : विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या लाजिरवाण्या मालिका पराभवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेत एकाच खळबळ माजवून दिली. २०१४ ला धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेच्या मध्यात कर्णधारपद सोडल्यामुळे विराटकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

विराटने शनिवारी संध्याकाळी ट्विटरवरून कसोटी कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. कोहलीने अनेकांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेत ट्विट केले. त्यात त्याने लिहिले, ‘प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे थांबावेच लागते. भारताचा कसोटी कर्णधार म्हणून माझ्यासाठी आता थांबण्याची वेळ आली आहे. या प्रवासात अनेक चढउतार आले, मात्र माझ्या प्रयत्नात आणि विश्वासात मी कमी पडलो नाही.’

भारताने द. आफ्रिकेविरुद्ध मालिका १-२ ने गमावल्याच्या एक दिवसानंतर विराटने हा निर्णय घेतला. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला. त्याच्याच नेतृत्वात संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली. ३३ वर्षांच्या विराटने अलीकडे टी-२० चे नेतृत्व सोडल्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून वन डे संघाचे नेतृत्वदेखील काढून घेतले होते.

मागच्या वर्षी झालेल्या इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात काहीतरी शिजत असल्याची चुणूक लागली होती. त्या दौऱ्यावरील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर संघातील वातावरण बदलल्याचे म्हटले गेले. मागील पाच महिन्यांत विराटनं त्याच्या चाहत्यांना धक्क्यांमागून धक्के दिले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद, त्यानंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद त्याने सोडले. त्यानंतर वन डे संघाच्या कर्णधारपदावरून त्याला हटवण्यात आले आणि आज त्यानं कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले.

२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर विराटनं या स्पर्धेनंतर संघाचे नेतृत्व करणार नसल्याचे जाहीर करून पहिला धक्का दिला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्यानं फटाके फोडले. ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडताना बीसीसीआयकडून कुणीच समजावले नाही, असा दावा केला. जो बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या दाव्याच्या परस्पर विरुद्ध होता. गांगुलीनं मी स्वतः विराटला समजावण्याचा प्रयत्न केल्याचे विधान केले होते. त्याच दिवशी बीसीसीआयनं रोहित शर्माची वन डे संघाचा कर्णधार म्हणून घोषणा केली.

याही निर्णयाबाबत ९० मिनिटांच्या बैठकीच्या अखेरीस सांगितल्याचा गौप्यस्फोट विराटनं केला. त्यानंतर बीसीसीआयकडून अनेक बचावात्मक स्टेटमेंट आल्या. पण, नेमकं खरं कोण बोलतंय हेच अजूनही कळलेले नाही. निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनीही पत्रकार परिषदेत विराटचा दावा खोडण्याचा प्रयत्न केला. आता या सामन्याचा पुढील अंक विराटच्या कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्यावर चालणार असं दिसतंय.

कोहलीची विराट कामगिरी

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली. २०१५-१६ हंगामात भारताने श्रीलंकेला घरच्या मैदानावर पराभूत केले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. २०१६ मध्येच, भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला आणि त्यानंतर देशांतर्गत हंगामात सलग १३ कसोटी सामने जिंकले. त्या मोसमात भारताने सलग चार कसोटी मालिका जिंकल्या. त्यांचा एकमेव पराभव ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात झाला. त्यानंतर २०१७-१८ च्या मोसमात भारताने श्रीलंकेवर पाठोपाठ विजय मिळवित मालिका जिंकली. २०१८ साली भारताने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेकडून मालिका गमावली, पण नंतर जोरदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत करणारा विराट पहिला आशियाई कर्णधार बनला. विराट कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.

बीसीसीआय म्हणाले, ‘अभिनंदन विराट’!

बीसीसीआयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, बीसीसीआय टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे अभिनंदन करते, ज्याने आपल्या प्रशंसनीय नेतृत्व गुणांमुळे संघाला अभूतपूर्व उंचीवर नेले. त्याने ६८ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून ४० विजय मिळवले आणि तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.

भावनिक पत्र लिहून मोकळं केलं मन !

https://twitter.com/imVkohli/status/1482340422987169794

‘७ वर्ष सर्वांच्या अथक मेहनतीनं संघाला योग्य दिशा दाखवली. मी पूर्ण प्रामाणिकपणे माझे काम केले आणि त्यात कोणतीच कसर सोडली नाही. प्रवासात कुठेतरी थांबा घ्यावा लागतो आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून माझ्यासाठी तो क्षण आला आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार आले, परंतु आम्ही प्रयत्न करण्यात कुठेही थांबलो नाही आणि स्वतःवरील विश्वास कायम ठेवला. नेहमी १२० टक्के देण्यावर माझा विश्वास होता आणि ते मी दिले. जेव्हा मी तसं करण्यात अपयशी ठरलो, तेव्हा मला हे माहीत होतं हे योग्य नाही. माझ्या मनात कोणतीची शंका नाही आणि माझ्या संघाची मी प्रतारणा करू शकत नाही,’ असे विराटनं पत्रात लिहिलं.

तो पुढे म्हणाला, ‘एवढा प्रदीर्घ काळ मला संघाचे नेतृत्व सांभाळण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो. या जबाबदारीच्या पहिल्या दिवसापासून मी जे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं होतं, ते पूर्ण करण्यासाठी संघातील प्रत्येक सहकाऱ्यांनी योगदान दिले आणि कोणत्याही कठीण प्रसंगी ते डगमगले नाही. तुमच्यामुळे हा प्रवास सुंदर आणि अविस्मरणीय झाला. रवी भाई आणि संपूर्ण यंत्रणा या यशामागचं इंजिन होते. अखेरचं पण, महेंद्रसिंग धोनीचे मनापासून आभार, त्यानं कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मी योग्य व्यक्ती असल्याचा विश्वास त्यानं दाखवला.’

https://twitter.com/BCCI/status/1482386303606226945

आणखी दोन-तीन वर्ष त्यानं कर्णधारपदावर रहायला हवं होतं; बीसीसीआयकडून प्रतिक्रिया

विराटच्या ट्वेंटी-२० कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावरून बरंच रामायण झालं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, तर विराट म्हणतो माझ्याशी कुणी बोललंच नाही. मी निर्णय सांगितला आणि त्यांनी गप्प ऐकून त्याचा स्वीकार केला. यात खरं कोण खोटं कोण हे व्हायचं बाकी आहे. त्यात आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराटनं कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडलं. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विराट अव्वल स्थानी आहे. आता त्याच्या या निर्णयावर बीसीसीआयकडून प्रतिक्रिया आली आहे.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी सांगितले की, बीसीसीआय किंवा निवड समितीकडून विराटवर कर्णधारपद सोडण्यासाठी कोणताच दबाव नव्हता. हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. परंतु आणखी दोन-तीन वर्ष त्यानं कर्णधारपदावर रहायला हवं होतं.

ते पुढे म्हणाले, विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे, यात तीळमात्र शंका नाही. त्याच्या नेतृत्व कौशल्याखाली, मार्गदर्शनाखाली आणि फलंदाजीच्या कौशल्याच्या जोरावर भारतीय संघ पुढेही दमदार कामगिरी करेल, याची मला खात्री आहे. दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभव हा त्याच्या निर्णयामागील कारण असेल, असं मला वाटत नाही. तो कदाचीत येथे कसोटी मालिका जिंकणारा पहिला कर्णधारही बनला असला. आता ही नेतृत्वाची जबाबदारी दुसऱ्याकडे जावी, असा त्याचा विचार असेल. तो ७ वर्ष संघाच्या कर्णधारपदावर आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची प्रतिक्रिया

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा कार्यकाळ अविश्वसनीय होता. त्यासाठी त्याचे अभिनंदन. विराटनं असा निडर संघ तयार केला की जो घरात आणि घराबाहेर कोणत्याही प्रतिस्पर्धीला टक्कर देण्याची धमक राखतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड येथे मिळवलेले कसोटी विजय हे खास आहेत, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले आहे.

कोहलीनंतर आता कर्णधार कोण?

कोहलीच्या राजीनाम्यानंतर आता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी तीन प्रबळ दावेदार मानले जात आहेत. यात रोहित शर्माचं नाव सर्वात आघाडीवर आहे.

विराट कोहलीनंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा याचंच नाव सर्वात आघाडीवर आहे. कारण रोहित शर्मा याची याआधीच एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघासाठी बीसीसीआयनं कर्णधारपदी नियुक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकच कर्णधार मिळण्याची दाट शक्यता आहे. रोहित शर्माला नेतृत्त्वाचा अनुभव आहे. तसंच तिन्ही प्रकारात एकच कर्णधार असावा याकडेच बीसीसीआयचा कौल राहिला आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो.

रोहित शर्मानंतर केएल राहुल याचं नाव कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी घेतलं जाऊ शकतं. रोहित आणि कोहलीनंतर केएल राहुल संघात अनुभवी खेळाडू आहे. तसंच विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल याच्याकडे संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सोपविण्यात आली होती. केएल राहुल सध्या अवघ्या २९ वर्षांचा आहे. त्यामुळे दिर्घकाळासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून केएल राहुलकडे पाहिलं जाऊ शकतं. बीसीसीआयनं जर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात वेगवेगळे कर्णधार नियुक्त करण्याचा विचार केला तर केएल राहुलच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.

भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तिसरा मोठा दावेदार आहे. जसप्रीत बुमराहला नुकतंच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं होतं. बुमराह भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज असून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याचा संघात समावेश असतो. तसंच बुमराहचं कमी वय लक्षात घेता एका युवा खेळाडूला संधी देण्याच्या दृष्टीकोनातून त्याचा कर्णधार म्हणून विचार केला जाऊ शकतो.

माझ्यासाठी हा वाईट दिवस; विराटच्या राजीनाम्यानंतर रवी शास्त्रींचं टि्वट

कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एक भावनिक संदेश पाठवला आहे. “व्यक्तिगत पातळीवर माझ्यासाठी हा वाईट दिवस आहे. जगातील एका यशस्वी कसोटी कर्णधाराचा आज आठ वर्षांचा कार्यकाळ संपला” असं रवी शास्त्रींनी म्हटलं आहे.

https://twitter.com/RaviShastriOfc/status/1482365980827594753

विराट कोहलीने तडकाफडकी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका हरल्यानंतर त्याने राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला. विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी आणि कसोटी क्रिकेटमधील एक आक्रमक कर्णधार आहे, असं रवी शास्त्रींनी म्हटलं आहे.

विराट मान उंच ठेव. तू कर्णधार म्हणून जे मिळवलं, ते फार कमी जणांना जमलय. तू भारताचा सर्वात यशस्वी आणि आक्रमक कॅप्टन आहेस. माझ्यासाठी व्यक्तिगत पातळीवर हा वाईट दिवस आहे. ही टीम म्हणजे भारताचा ध्वज असून आपण दोघांनी मिळून हा संघ बांधला, असे रवी शास्त्रींनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button