Top Newsराजकारण

सरकार पडत नसल्याने चंद्रकांतदादा निराश, पण प्रयत्न सुरू ठेवा; संजय राऊतांचा टोला

कुणी भूंकत असेल, तर भुंकू द्या; सोमय्यांवर निशाणा

मुंबई: चंद्रकांतदादा निष्पाप आहेत. स्वच्छ हृदयाचे आहेत. निर्मळ मनाचे आहेत. त्यांच्या भावना मी समजू शकतो. राज्यातील आघाडी सरकार पडत नसल्याने त्यांना नैराश्य आलं आहे. त्यामुळे ते असं बोलत असतात. त्यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी काल पुन्हा एकदा येत्या १० मार्चनंतर राज्यातील आघाडी सरकार कोसळणार असल्याचा पुनरुच्चार केला. पाच राज्यांतील निवडणुका झाल्यानंतर ठाकरे सरकारही जाईल, असं पाटील म्हणाले होते. त्यावरून राऊत यांनी पाटलांना कोपरखळी लगावतानाच त्यांना सरकार पाडण्यासाठी खोचक शब्दात शुभेच्छाही दिल्या.

चंद्रकांतदादा सरकार पाडण्याच्या तारखा देत राहतील, त्याविषयी वाईट वाटत नाही. गेल्या दोन वर्षापासूनचा त्यांच्यावरचा प्रसंग समजू शकतो. दादांविषयी मला पूर्ण सहानभूती आहे. दादा किंवा त्यांचा पक्ष असेल. ते फार निष्पाप, स्वच्छ हृदयाचे, निर्मळ मनाचे आहेत. त्यांचा प्रयत्न असतो सरकार पाडण्याचा पण सरकार पडत नाही. त्यातून नैराश्य येतं. मग पुढची तारीख देतात. १० मार्चनंतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका येतील. त्यानंतर सरकार पडेल, असं आता ते म्हणाले. या आधी पश्चिम बंगालच्या निवडणुका होत्या. त्यानंतर सरकार पडणार असं म्हणाले होते. सरकार पाडण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले पाहिजे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरू आहेत. कारण त्यांच्याकडे दुसरं काही नाही. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी माझ्या त्यांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा आहेत. त्यांनी त्यांची हत्यारे वापरावीत, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

आम्हाला पाडता पाडता ते स्वत: पडले. त्यांच्यावर काय आभाळ कोसळले. ते मला माहीत आहे. तामिळनाडूच्या निवडणुकीनंतरही सरकार पाडणार होते. तेही होऊ शकलं नाही. पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

कुणी भूंकत असेल, तर भुंकू द्या !

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांनी पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत. याच आरोपांवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता शिवसेनेची शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार त्याआधी ज्या फाईल ज्यांना दाखवायच्या आहेत त्यांना दाखवा. ही माझी नाही तर पक्षाची पत्रकार परिषद असेल. शिवसेनेची असेल. त्याआधी महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद होईल, मी घाबरत नाही, जे काम केले आहे, देशाने नाही पूर्ण जगाने पाहिले आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल हायकोर्ट आणि संपूर्ण जगात वाहवाह झाली त्याबद्दल अनेकांच्या मनात दु:ख आहे, पुण्यातील कोरोना केंद्र मुंबईतील कोव्हिड केंद्र… आमच्या इथे गंगेत मृतदेह वाहत नव्हते. भाजपवाल्यांना गुन्हे दाखलचं करायचे आहेत तर युपी, वाराणसी, काशीमध्ये जाऊन करा. तिथे हजारो मृतदेह वाहून गेले… गुजरातमध्ये दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी ज्या रांगा लागल्या होत्या त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, त्या सरकारने केलेल्या घोटाळ्यांची चौकशीची मागणी केंद्र तपास यंत्रणांकडून करा. महाराष्ट्रात जे झाले ते देशाने पाहिले. कोणी जर भुंकत असले तर त्याकडे महाराष्ट्रातील जनता लक्ष देणार नाही. कोणाताही घोटाळा झालेला नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. कुणी भूंकत असते, तर भुंकू द्या त्यांना सवय असते, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

मुंबई, नाशिक, पुण्यातील कोव्हिड सेंटर सर्वच कोव्हिड सेंटरसाठी त्याकाळी सरकारसोबत काही सामाजिक लोकं होती. कोव्हिड हा असा आजार आहे ज्यामुळे लोकं जवळ जायला घाबरतं होते. अशावेळी काही संस्था पुढे आल्या आणि त्यांनी कोव्हिड सेंटर चालवली. भाजपची लोकं नव्हती. पुढे येते नव्हते, घाबरून बसले होते नंतर आले पण आमची लोकं होती. आणि आता त्यांच्यावर घाणेरडे आरोप करतायत. राजकारण नंतर समाजकारण आधी, भाजपाला आरोपचं करायचे आहेत तर उत्तरप्रदेशमध्ये जा गंगेत हजारो प्रेत वाहत जात होती फेकून दिली होती, उपचार होत नव्हते, त्यांवर गुन्हे दाखल करा. जे इथे फाईली घेऊन फिरतायत त्यांचीही फाईली तयार आहेत. तेव्हा कळेल फाईल काय असते. आम्ही तुम्हाला घाबरतं नाही, असंही राऊत म्हणाले.

गोव्यात खिचडी, तर उत्तर प्रदेशात अखिलेश यादवच

आम्ही गोव्यातून आलो. आता उत्तर प्रदेशात जाणार. आदित्य ठाकरेही उत्तर प्रदेशात जाणार आहेत. उत्तर प्रदेशात खिचडी पकत नाही. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव पुढे आहेत. गोव्यात खिचडी आहे. पण काँग्रेस थोडं पुढे आहे. पण टक्कर आहे. गोव्यात देवेंद्र फडणवीस ठाण मांडून आहेत. पण जमिनीवरचं चित्रं वेगळं आहे. मी कुणाविषयी बोलत आहे हे फडणवीसांना माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या विधानावरही त्यांनी भाष्य केलं. या महाशयाची संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेली. तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला नाही का? तेच राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी आहेत. त्यांच्यासोबत बिस्वा यांनी आयुष्य काढलं आणि आता त्यांच्याविरोधात बोलत आहेत. हे गैर आहे. आपल्या आधीच्या नेत्यांविषयी अशा भाषेत बोलणं योग्य नाही, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button