राजकारण

माझ्या राजीनाम्याच्या बातम्या तथ्यहीन : अनिल देशमुख

राजेश टोपे यांनीही चर्चा फेटाळली

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांना शरद पवारांनी शुक्रवारी तत्काळ दिल्लीला बोलावून घेतल्याची चर्चा आहे. दिल्लीत अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीत अँटलिया स्फोटक प्रकरणी शरद पवारांना सविस्तर माहिती दिली, तसंच राज्यातील इतर प्रश्नांची चर्चा झाल्याचंही अनिल देशमुख यांनी भेटीनंतर सांगितलं. आता त्यांनी स्वतः ट्विट करत आपल्या राजीनाम्यांच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

सचिन वाझे प्रकरणाने राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिरतेचं वातावरण निर्माण केलंय. सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांडगी झाली. आता पुढे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नंबर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अलिशान अँटलिया या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर त्या प्रकरणात एपीआय सचिन वाझेला एनआयएने अटक केली. ज्या गाडीत स्फोटकं भरलेली होती त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याच्या संशयास्पत मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं.

नेमकं त्यावेळी राज्याचे अधिवेशन सुरू होते. विरोधकांनी या मुद्यावर अधिवेशनात सरकारला उघडं पाडलं. त्याचबरोबर गृहविभागावर गृहमंत्री अनिल देशमुखांची पकड नसल्याचंही या घटनेनं दाखवून दिलं. अधिवेशन संपल्यानंतर या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारच अडचणीत असल्याचं चित्र उभं राहिलं. याप्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारची आणि मुंबई पोलीस दलाची प्रचंड बदनामी झाली. सरकारची प्रतिमा जपण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या बदलीवर हे प्रकरण थांबेल अशी शक्यता होती. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या गटबाजीबाबत जाहीर वक्तव्य केलं. तसंच पोलीस अधिकाऱ्यांकडून काही गंभीर चुका झाल्याची कुबुलीही त्यांनी दिली.

राजेश टोपे यांनीही चर्चा फेटाळली
मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना NIA ने अटक केल्यानंतर गृहखात्याची मोठी नाचक्की झाली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) हे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसंच अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्रिपदाची जबाबदारी काढून घेण्यात येऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचं नाव गृहमंत्रिपदासाठी चर्चेत आलं आहे. मात्र स्वत: राजेश टोपे यांनी सध्या तरी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

गृहमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता राजेश टोपे यांनी स्पष्ट शब्दांत खोडून काढली आहे. ‘राष्ट्रवादी शिस्तीचा पक्ष असून सर्व निर्णय पवार साहेबच घेतील. मात्र गृहमंत्रिपद अनिल देशमुख यांच्याकडेच राहणार आहे. त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळच येणार नाही,’ असा खुलासा राजेश टोपे यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button