Top Newsराजकारण

नारायण राणेंच्या नावावर १०० बोगस कंपन्या; सोमय्यांनी केलेल्या आरोपांचा शिवसेनेकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’!

खा. विनायक राऊतांनी केली नारायण राणेंची बोलती बंद !

मुंबई : शिवसेना आणि भाजपमधील वादानं आता नव वळण घेतलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या पत्रकार परिषदेच्या मालिकाच सुरू झाल्या आहेत. शिवसेना नेते आणि खा. संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं. आता राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणेंच्या टीकांना प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’चा आधार घेत थेट किरीट सोमय्यांचे व्हिडिओच पत्रकार परिषदेत दाखवले आहेत. एकेकाळी किरीट सोमय्यांनी नारायण राणेंच्या नावावर १०० बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांना घाबरुनच नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. खा. विनायक राऊत यांनी नारायण राणे यांनी भाजपवर केलेल्या टीका आणि सोमय्यांनीच केलेल्या आरोपांचे व्हिडीओ लावून एकच धुरळा उडवून दिला.

नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरेंनी नेता केला नाही म्हणजे त्यांची काय लायकी केली हे त्यांना माहीत आहे. राणे आधी कोण होते हे अवघ्या शिवसेनेला माहिती आहे. संजय राऊत हे आमचे नेते आहे त्यांना ईडीच्या माध्यमातून त्रास देण्यास सुरूवात केली. ईडीच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे संजय राऊत यांनी केले. नारायण राणेंच्या मागे जेव्हा ईडी लावली तेव्हा ते भाजपासाठी सरेंडर झाले, असं म्हणत राऊत यांनी राणेंवर टीकास्त्र सोडले.

नारायण राणे स्वार्थीपणासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. नारायण राणे यांचा जो काही कंठ फुटला आहे तो बेगडी आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले हे त्यांना पाहावत नाही. किरीट सोमय्या यांनी जी नारायण राणेंच्या विरोधात आरोपाची मालिका सुरू केली. त्याच सोमय्या यांनी नारायण राणेंवर बोगस कंपन्यांचे आरोप केले ते आम्ही तुम्हांला दाखवतो, असं म्हणत सोमय्यांच्या आरोपांचा व्हिडीओच पत्रकार परिषदेत दाखवला. त्यात सोमय्या यांनी सध्याचे भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांच्यावर १०० बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. ईडीची चौकशी मागे लागेल म्हणूनच नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असा खळबळजनक आरोप विनायक राऊत यांनी यावेळी केला आहे. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खोटारडा असा उल्लेख नारायण राणे यांनी केल्याचा आणखी एक व्हिडिओ सादर केला. नरेंद्र मोदी हा एनडीएचा खोटारडा उमेदवार असल्याचं नारायण राणे म्हणाले होते असा व्हिडिओ विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दाखवला.

नितेश राणेंनी सोमय्यांवर केले होते आरोप

विनायक राऊत यांनी आणखी एका व्हिडिओत नितेश राणे हे किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत असल्याचा एक व्हिडिओ देखील दाखवला. किरीट सोमय्या हे मराठी भाषेच्या विरोधात असून त्यांनी मुंबईतील शाळांमध्ये मराठीच्या सक्तीला विरोध केला. तसेच भाजपाच्या काही नेत्यांनी दक्षिण मुंबई ही शाकाहारी झोन जाहीर करा अशी मागणी केल्याचा आरोप नितेश राणे यांनी त्यावेळी केला होता, असं विनायक राऊतांनी व्हिडिओ पुरावे सादर करत जोरदार हल्लाबोल केला. तसंच किरीट सोमय्यांनी नारायण राणेंवर केलेल्या आरोपांचं काय झालं याबाबत ईडीकडे चौकशी करणार असल्याचंही विनायक राऊत यांनी यावेळी सांगितलं. इतकंच नव्हे. तर राजन तेलींनी नितेश राणेंवर केलेल्या आरोपाचा एक व्हिडिओ दाखवून नारायण राणेंचं असेच व्हिडिओ यापुढील काळात सर्वांसमोर आणणार असल्याचं विनायक राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button