आरोग्य

लसीचा साठा संपला; बीकेसीतील लसीकरण केंद्र पुन्हा बंद

मुंबई : मुंबईतील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी जम्बो कोविड सेंटरमध्ये लसीचा साठा संपल्याने बीकेसी लसीकरण केंद्र बंद करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर बीकेसी लसीकरण केंद्र लसीकरणासाठी पुन्हा एकदा सुरु करण्यात येईल असेही सांगण्यात आले.

बीकेसी केंद्रावरील लस साठा संपल्याने नागरिकांना आजही लस न घेताच घरी परतावे लागले. बीकेसीप्रमाणेच मुंबईत एकूण १९ ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र आज बंद राहणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील लसीसाठा कमी झाल्याने मुंबईतील अनेक खासगी लसीकरण केंद्र बंद करावी लागली.

१ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरण तीन टप्प्यात केले जाणार आहे. मुंबई महानगर पालिकेची लसीकरण करण्यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. मात्र लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. लसींचा साठा नसेल तर लसीकरण केंद्र सुरु ठेवून फायदा नाही. जस जसा लसीचा मुबलक साठा येईल तशी लसीकरण केंद्र सुरु करण्यात येतील. १ मे पासून होणाऱ्या लसीकरणासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र करण्याची तयारी महापौरांनी दाखवली आहे. त्याचप्रमाणे लसीचा पुरवठा नसल्याने सध्या नागरिकांना लस घ्यायला जाण्याआधी लसीकरण केंद्रावर लस आहे का हे तपासून पहा त्यानंतरच लस घेण्यासाठी घराबाहेर पडा असे आवाहनही महापौरांनी केले आहे.

येत्या १ मे पासून मुंबईसह राज्यात १९ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. कोविन अँपवर लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button