आरोग्य

‘कोविड-१९ आपत्ती’ घोषित करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींना विनंती

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर झाली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बुधवार १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १४४ कलम लागू करत राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली असून अत्यावश्यक कारण नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले. यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ हजार ४७६ कोटी रुपयांचे पॅकेजही जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महामारीला आपत्ती घोषित करावी, अशी विनंती केली. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत गरजू लोकांना आर्थिक मदत दिली जावी, अशीही विनंती केली.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी राज्याला संबोधित केले. भूकंप, मुसळधार पाऊस आणि पूर आल्यास नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर केले जाते. तसेच या आपत्तीने बाधित लोकांना आर्थिक मदत दिली जाते. यासह आपण सर्वांनी एक नैसर्गिक आपत्ती म्हणून कोरोना महामारी असा या रोगाचा स्वीकार केला आहे. म्हणूनच, पंतप्रधानांना मी विनंती करतो की, ज्या लोकांच्या जीवनावर या नैसर्गिक आपत्तीचा, महामारीचा परिणाम झाला आहे त्यांना आर्थिक सहाय्य करावे. दरम्यान, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने पंतप्रधानांना पत्र लिहिले.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु बेडची कमतरता निर्माण झाली असून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. या लॉकडाऊन दरम्यान, अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व सेवा बंद राहणार असून. मात्र, सार्वजनिक वाहतूक जसे रेल्वे, बस या केवळ अत्यावश्यक सुविधेतील कर्मचार्‍यांसाठी लागू राहतील. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी ५४०० कोटी रुपयांचे लॉकडाऊन पॅकेज जाहीर केले. याशिवाय राज्यातील ७ कोटी नागरिकांना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ महिनाभर मोफत दिले जाणार आहे. इतकेच नाही तर गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी मोफत दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button