राज्यात २४ तासांत २४,७५२ नवे कोरोना रुग्ण; ४५३ जणांचा मृत्यू
मुंबईत दिवसभरात १,३६२ बाधितांची नोंद; ३४ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात बुधवारी कोरोना रुग्ण होण्याचे प्रमाणात किंचीत घट झाली असून मृत्यूदरात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत २४ हजार ७५२ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ लाख ५० हजार ९०७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९१ हजार ३४१ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात २३ हजार ६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५२ लाख ४१ हजार ८३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६२ टक्के एवढा आहे. राज्यात अजूनही ३ लाख १५ हजार ४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ३८ लाख २४ हजार ९५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख ५० हजार ९०७ (१६.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३ लाख ७० हजार ३२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९ हजार ९४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात १,३६२ बाधितांची नोंद; ३४ जणांचा मृत्यू
मुंबईत नेहमी बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आहे. मुंबईत कोरोनाचा आकडेवारीत चढ उतार होत आहे. बुधवारी मुंबईची संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. मुंबईत बुधवारी १ हजार ३६२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ७ लाख १ हजार २६६ वर गेली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट काल ९४ टक्के इतका नोंदवण्यात आला. मात्र आज मुंबईत रिकव्हरी आकडा कमी नोंदवण्यात आला आहे. मुंबईत आज १ हजार २१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल हीच संख्या १ हजार ४२७ इतकी होती.
मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूच्या आकड्यातही चढ उतार पहायला मिळत आहे. आज मुंबईत ३४ जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. कालच्या तुलनेत आज काही अंशाने ही संख्या कमी झाली आहे. मात्र ही संख्या सातत्याने कमी होणे महत्त्वाचे आहे. मुंबईत आतापर्यंत १४ हजार ७४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या २७ हजार ९४३ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईचा १९ मे ते २५ मे दरम्यान विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.१९ टक्के इतका आहे. सध्या मुंबईतील सक्रिय सील बंद इमारतींची संख्या कमी होऊन २०० वर आली आहे. तर केवळ ४४ सक्रिय कंटेनमेंट झोन मुंबईत आहेत.




