पहिल्याच दिवशी लसीकरणाचा बोजवारा

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी आजपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची मोफत लस दिली जात आहे. परंतु, लशीचा साठाच नसल्यामुळे अनेक केंद्र बंद आहे. तर ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांनाच लस दिली जात आहे. मुंबईत जोपर्यंत एसमएमस मिळत नाही, तोपर्यंत लसीकरण केंद्रावर येऊ नका, असं आवाहनच महापौरांना करावं लागले आहे. राज्यात ठिकठिकाणी हीच परिस्थिती पाहण्यास मिळत आहे.
आज १ मे पासून राज्यात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जात आहे. पण, लसीकरणाचा साठाच नसल्यामुळे लसीकरण होणार नाही, असं आधीच जाहीर करण्यात आलं होतं. पण, काही ठिकाणी तरुणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. तर काही जण लस घेण्यासाठी सकाळपासून लसीकरण केंद्रावर रांगा लावून आहे. राज्यात १८ वर्षावरील नागरिकांना लसीकरण मोहिमेला आजपासून राज्यात सुरुवात झाली आहे. यात योजनेची सुरवात म्हणून काही मोजक्या लोकांना लसीकरण करण्यात आले. मुंबईत लसीकरण मोहिमेला एक वाजता सुरुवात झाली. महापालिकेच्या ५ रुग्णालयात नाव नोंदणी केलेल्या निमंत्रित लोकांना १ ते ४ वाजेच्या दरम्यान लसीकरण केले जात आहे.
पुण्यात गोंधळ
पुण्यात लसीकरण केंद्रावर आजही गोंधळ कायम आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी पुण्याला २० हजार लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात फक्त १९ केंद्र सुरू असून २ केंद्र पुण्यात आहेत. त्यामध्ये कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय येरवडा येथे आजच्या दिवशी लसीकरण केलं जाणार आहे. शहरात एकूण ७०० नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र, अनेकांनी नोंदणी केली असली तरी नियोजन केंद्र आणि वेळ निश्चित होत नसल्यानं लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम असून नागरिकांनी मोठी गर्दी केली.
नागपुरात लसीकरण पुढे ढकलले
नागपूरमध्ये लसीचा साठा उपलब्ध नसल्याने ही मोहीम पुढे ढकलण्याची माहिती काल नागपूरच्या पालिका आयुक्तांनी दिली होती. मात्र, मुंबईला प्रशासकीय स्थरावर निर्णय झाल्याने आज नागपूरमध्ये मर्यादित स्तरावर १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यासाठी लाभार्थ्यांचे नाव नोंदवून त्यांना टोकन दिले जात आहे. २ नंतर लसीकरणाला सुरवात होईल, असे सांगितले जात आहे.
वर्ध्यात सोमवारपासून लसीकरण
वर्ध्यात लशीचा साठा पोचलाच नसल्याने लसीकरण होणार नाही. केंद्र सरकारने दिलेले डोस राज्य सरकारला वापरता येणार नाही. महाराष्ट्र सरकारने राज्यासाठी ३ लाख डोसची खरेदी केली आहे. त्यापैकी जिल्हासाठी ५ हजार डोस आज संध्याकाळपर्यंत मिळणार आहे. जिल्ह्यात पाच केंद्रावरून लसीकरण केले जाणार आहे. वर्ध्यातील लेप्रसी फाउंडेशन रामनगर, पोलिस रुग्णालय वर्धा, यूपीएस टाका ग्राउंड हिंगणघाट, उपजिल्हा रुग्णालय आर्वी, ग्रामीण रुग्णालय पुलगावचा समावेश आहे.
अहमदनगरमध्ये लसीकरणाचा फज्जा
अहमदनगर जिल्ह्यातील लसीकरणाच्या फज्जा वाढला आहे. नागरिक रांगा लावून उभे आहेत मात्र लस मिळेल का नाही याचा भरोसा नसतो. नगर शहरसह जिल्ह्यात हिच परिस्थिती आहे. शासनाने १८ वर्षाच्या वरील सर्वाना लस देणार अशी घोषणा केली मात्र स्थानिक स्थरावर कुठली तयारी नाही. मात्र, रात्री उशिरा अहमदनगर जिल्ह्यासाठी दहा हजार लशी प्राप्त झालेले आहेत. त्या दहा हजार लशीचे लसीकरण अहमदनगर शहरांमध्ये पाच केंद्रावर हे लसीकरण करणार आहे. मात्र रात्री लशींचा जो साठा आला आहे तो अजून पर्यंत जिल्हा परिषदेत असून तो पालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहे, त्यानंतर लसीकरण सुरू होईल परंतु घोषणा केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्याने लसीकरणाचा फज्जा उडाला आहे.




