महाराष्ट्रात १ जूननंतर लॉकडाउन वाढण्याचे संकेत
कोरोना स्थिती आटोक्यात, पण गाफील राहू नका : उद्धव ठाकरे

रत्नागिरी : कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारकडून लॉकडाउनमध्ये १ जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य सरकारने निर्बंधदेखील कठोर केले आहेत. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी काळ्या बुरशीचं संकट, लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी लागणारी तयारी यामुळे लॉकडाउन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ जूननंतर लॉकडाउन वाढविण्याचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोरोना स्थितीसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, कोरोना कमी होतोय हे नक्कीच पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला. सध्याचा करोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील, असंही ते म्हणाले. लॉकडाउन वाढणार का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीही गाफील राहू नये.




