देशातील सर्व प्रौढांचें लसीकरण २०२१ अखेर पूर्ण करणार : हर्षवर्धन
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी बुधवारी घेतलेल्या कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाच्या आढावा बैठकीत असे म्हटले आहे की, या वर्षाच्या अखेरपर्यंत देश २६७ कोटी कोरोना लसींचे डोस खरेदी करेल आणि देशातील सर्व प्रौढांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या टप्प्यात असेल. जुलैपर्यंत कोरोना लसींचे ५१ कोटी लसींचे डोस खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच देशातील फ्रंटलाईन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण करणे गरजेचे असल्याचेही केंद्री आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.
हर्षवर्धन यांनी बुधवारी ८ राज्यांतील कोरोना लसीकरणाचा आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी या सूचना दिल्या आहेत. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, येत्या जुलैपर्यंत ५१ कोटी डोस खरेदी करण्यात येणार आहेत. तर ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीपर्यंत देशात २१६ कोटी कोरोना लसींचे डोस खरेदी करण्यात येणार आहेत. यामुळ वर्षअखेरपर्यंत देशातील किमान प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्याच्या स्थितीत असेल.
पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील ८ राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून तेथील कोरोना रुग्णांची वाढ, मृत्यू दर वाढला आहे. छोट्या राज्यांमध्येही कोरोना रुग्णवाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अधिक उपाययोजना करुन सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. केंद्र सरकार कोरोनाशी लढण्यासाठी उपाययोजना करत आहे. आपल्या देशात आता २००० पेक्षा अधिक कोरोना परीक्षण प्रयोगशाळा आहेत.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि अधिक बाधितांचा शोध घेण्यासाठी दिवसाला २५ लाख नागरिकांचे कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मंगळवारी देशात २० लाख पेक्षा अधिक नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून हा जागतिक रेकॉर्ड झाला आहे. हर्षवर्धन यांनी कोरोना रोखण्याच्या उपाययोजना करण्यासोबत कोरोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.