…तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला धोका नाही : मुश्रीफ
चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची माफी मागावी
मुंबई: राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस बरेच प्रयत्न करत आहेत. मात्र, शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र असेपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
‘तुम्ही पंढरपूरमध्ये भाजपला साथ द्या…मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’, अशा आशयाचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील प्रचारसभेत केले होते. त्यानंतर भाजपने महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांना धोबीपछाड देत पंढपूरची निवडणूक जिंकली. त्यामुळे आता भाजप राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याची कुजबूज सुरु झाली आहे. चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर या दोघांनी यासंदर्भात थेट भाष्य करणे टाळले असले तरी देवेंद्र फडणवीस बोलत असतील तर त्यामध्ये तथ्य असेलच, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेने जोर धरायला सुरुवात केली होती.
मात्र, हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना हे सर्व दावे फेटाळून लावले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचं हे सरकार पुढील २५ वर्षे चालेल, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.
‘पंढरपूरात भगीरथ भालकेंच्या आईला उमेदवारी दिली असती तर…’
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचा पराभव हा लोकांच्या नाराजीमुळे झालेला नाही. तर याठिकाणी रणनीती आखण्यात महाविकासआघाडी थोडीशी कमी पडली. भगीरथ भालके यांच्याऐवजी त्यांच्या आईला उमेदवारी दिली असती तर काम सोपं झालं असतं. मात्र, आम्ही हा निकाल स्वीकारला आहे, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची माफी मागावी
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विजयी झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त करत भुजबळ यांनी धमकी दिली होती. आता याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले की, ममता दिदिंनी संघर्ष करुन पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला. ‘मेरा पश्चिम बंगाल मैं नही दूंगी’ असं म्हणत जखमी झालेली महिला देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री प्रचारात उतरलेले असतानाही त्यांनी विजय मिळवला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलेली होती. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना राग येण्याची गरज नव्हती. ते पुढे जाऊन म्हणाले, भुजबळ तुम्ही जामिनावर आहात, तुम्ही निर्दोष सुटलेला नाहीत. अन्यथा तुमचा जामिन रद्द करु, अशा आशयाची प्रतिक्रिया देताना. आज भारतीय जनता पक्षाच्या हातात ईडी, सीबीआय, एनआयए आहे. आता कोर्टही यांच्या खिशात असल्यासारखं ही मंडळी बोलू लागली आहेत. चंद्रकांत पाटलांनी तत्काळ आमचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची माफी मागावी. त्यांच्या बोलण्याचा जो रोख होतो, जो गर्व होता, तो जनता सहन करणार नाही, त्यामुळे तत्काळ भुजबळांची माफी मागावी.