Top Newsराजकारण

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक; भाजप नेत्यांचे ठाकरे सरकारवर तोंडसुख

रत्नागिरी/मुंबई/नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यानंतर राणेंच्या अटकेचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली होते. मात्र पोलिसांकडे कोणतंही अटक वॉरंट नसल्याचा दावा भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला होता. अखेर नाशिक पोलिसांच्या सूचनेनुसार रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली.

अटकपूर्व जामीनासाठी नारायण राणे यांनी रत्नागिरी न्यायालयात जामी अर्जाची याचिका दाखल केली होती. पण न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तातडीनं याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यासाठीही राणेंच्या वकिलांनी प्रयत्न केले. पण मुंबई उच्च न्यायालयानंही याप्रकरणावर तातडीनं सुनावणी देण्यास नकार दिला आहे. नाशिक पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना नारायण राणे यांना ताब्यात घेऊन नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांची सरकारी डॉक्टरांकडून वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

भाजपचे नेते राजभवनावर दाखल

राणे यांच्या अटकेनंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केलाय. तर दुसरीकडे भाजप आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले. अशावेळी मुंबईत भाजप नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला राजभवनावर दाखल झाले आहेत. भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह काही नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले आहेत. आता राज्यपाल कोश्यारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे.

राणेंच्या जीवाला धोका : प्रसाद लाड

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. इतकंच नाही तर राणे यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही लाड यांनी केलाय. राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांचं जेवणाचं ताट खेचण्याचा प्रयत्न केला. तसा एक व्हिडीओ आपण रेकॉर्ड केल्याचं लाड यांनी सांगितलं. इतकंच नाही तर लाड यांनी एक व्हिडीओही दाखवला आहे. राणे यांना ताटकळत ठेवून कोर्टात हजर करायचं नाही आणि त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राणे यांच्या जीवाला धोका आहे. आता एका मंत्र्याचा व्हिडीओ समोर आलाय. तो मंत्री फोनवरुन पोलीस अधीक्षकांना फोन करुन दबाव टाकताना दिसत आहे, असा आरोपही लाड यांनी केला. पोलिस राणेंसोबत ज्या पद्धतीने वागले त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. आमदार, खासदार, मंत्री बाजूला ठेवा. पण एका ज्येष्ठ नागरिकांला अशी वागणूक दिली जात आहे, जी चुकीची आहे. राणे यांची अद्याप अटक दाखवण्यात आलेली नाही. त्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की राणेंच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप लाड यांनी केलाय.

असे आहे नवे हिंदुत्व आणि नवा महाराष्ट्र : फडणवीस यांचा आरोप

दरम्यान, राणेंच्या अटकेवर प्रतिक्रिया देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही कारवाई सूडबुद्धीनं केल्याचा आरोप केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो. शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक! हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र !!!, असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला.

नारायण राणेंची अटक बेकायदेशीर; वकीलांचा दावा

नारायण राणे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात जे कलम लावण्यात आले आहेत. त्यात ७ वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर थेट अटक करण्याचा पोलिसांना अधिकार नाही. त्यामुळे नारायण राणे यांना केलेली अटक बेकायदेशीर आहे. त्यामुळे या अटकेविरोधात आम्ही योग्य त्या वेळी योग्य ठिकाणी दादा मागू अशी माहिती नारायण राणेंचे वकील अनिकेत निकम यांनी पुढे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांच्या माध्यमातून वारंवार सांगितलेले आहे की, एखाद्या गुन्ह्यात ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असेल तर भादंवि कलम ४१ (अ) अन्वये नोटीस बजावून नंतर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे. मात्र, थेट अटक करण्याचा अधिकार नाही.त्यामुळे नारायण राणेंची अटक बेकायदेशीर असल्याचं वकील अनिकेत निकम यांनी म्हटलं आहे.

राणेंच्या समर्थनार्थ केंद्रीय नेतृत्व सरसावले

नारायण राणेंवर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना केलेल्या ट्विटमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणेंची केलेली केली अटक ही घटनात्मक मूल्यांचे हे हनन करणारी आहे. या प्रकारच्या कारवाईमुळे आम्ही ना घाबरणार, ना दबून राहणार. भाजपला जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ही मंडळी त्रस्त आहे. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून लढत राहू, जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहील, असे जे.पी. नड्डा म्हणाले.

राणेंच्या अटकेविरुद्ध प्रखर विरोध करा; चंदक्रांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश

नारायण राणे यांच्या अटकेचा भाजप प्रखरतेने विरोध करेल. भाजप कार्यकर्ते राज्यभरात आंदोलन करेल. ही आंदोलनं इतकी तीव्र असतील की पुन्हा कुणी असं धाडस करू नये. नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. परंतु केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा देशातील पहिलाचा प्रसंग आहे. अनैसर्गिक पद्धतीने आलेले सरकार पोलिसांचा गैरवापर करतंय असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, दोन पक्षांनी अतिशय प्लॅनिंगनं शिवसेना-भाजपात वैर निर्माण करण्याचं काम केले हे उद्धव ठाकरेंना कळत नाही. हा आनंद सरकारमधील दोन पक्षांना मिळवून देण्यामागे उद्धव ठाकरेंचाही सहभाग आहे. प्रत्येकाची आपली एक शैली असते. भारतीताई, कपिल पाटील, भागवत कराड यांच्याप्रमाणे नारायण राणेंचा एक स्वभाव आहे. त्यांच्याशी चर्चा केली जाईल. परंतु कॅबिनेट मंत्र्याला अशाप्रकारे अटक केली जातेय हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अमित शाह यांनी नारायण राणे यांना फोन करुन संपूर्ण पक्ष तुमच्या पाठिशी आहे असं आश्वासन दिले आहे. नारायण राणे कुठेही सुसंस्कृतेला धक्का पोहचेल असं वागत नाही. भाजपा खूप मोठा पक्ष आहे. भाजपात वाढत चालली आहे. अनेकजण पक्षाशी जोडले जात आहेत. राज्यपालांना, पंतप्रधानांना काहीही बोलले तर चालतं का? दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकवा. त्यात लाठ्या-काठ्या हिंसा वापरणारी भाषा होती. नारायण राणेंकडून जर वक्तव्य झालं असेल तर पोलिसांनी समज देणारी नोटीस पाठवली का? नारायण राणेंच्या यात्रेला प्रतिसाद मिळत होता त्या प्रतिसादाला घाबरून सुडापोटी राणेंवर कारवाई केली आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु; आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा

नारायण राणे यांना घेऊन संगमेश्वर पोलीस महाडला रवाना झाले आहेत. नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी राज्यभरात अनेकविध ठिकाणी आंदोलने, निदर्शने केली. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. याचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो. राज्य सरकार आणि शिवसेनेला गर्भीत इशारा देऊ इच्छितो सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करू, असे भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानमधले तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील एवढी झुंडशाही हे महाराष्ट्र विकास आघाडीचे लोकं करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो. राज्यसरकार आणि शिवसेनेला गर्भीत इशारा देऊ इच्छितो सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करू. नारायण राणेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत नक्कीच संयम ठेवायला पाहिजे. त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यानंतर सुद्धा झुंडशाही आम्ही राज्यामध्ये बघत आहोत. शिवसेनेने हा तमाशा बंद करावा. भाजप कार्यालयाजवळ हे तमाशे चालू झाले तर भाजपा महाराष्ट्रभर तांडव करेल आणि त्याची जवाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहील, असा थेट इशारा आशिष शेलार यांनी दिला.

ठाकरे सरकारची इतकी तंतरली?, पिक्चर तो अभी शुरू हुई है : भातखळकर

राणे यांच्या अटकेवरून भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “राणे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली?” असं म्हटलं आहे. अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली? पिक्चर तो अभी शुरू हुई है, भाऊ…” असं म्हटलं आहे. तसेच “सूड दुर्गे सूड” असं म्हणत एक फोटोही पोस्ट केला आहे. “जनतेचा पाठिंबा आणि विश्वास नसेल तर पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ येते… हे फार काळ चालत नाही, ठाकरे सरकार…” असं देखील भातखळकर यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button