
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दात पक्के असल्याचे मानले जाते. त्यांनी एकदा शब्द दिला की तुमचे काम झालेच म्हणून समजा, असे बोलले जाते. इतकेच नाही तर अजितदादा कधीच हवेत बोलत नाहीत. त्यांनी दिलेली माहिती शंभर टक्के खरी असते, असे मंत्रालयात वार्तांकन करणारे पत्रकारही छातीठोकपणे सांगत असतात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अजितदादा तोंडघशी पडल्याचे दिसून आले.
हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सत्ताधार्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमादरम्यान, पत्रकारांनी अजितदादांना, अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का, असा प्रश्न केला होता. त्यावर अजितदादांनी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहणार, असे छातीठोकपणे सांगितले होते. पण पाच दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकही दिवस उपस्थित राहिले नाहीत. यामुळे कदाचित पहिल्यांदाच दादांचे शब्द खोटे ठरले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्यावर ऑपरेशन करण्यात आले. त्यांना डॉक्टरांनी सक्त विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या बायोबबलमध्ये आहेत. ते कोणालाही भेटत नाहीत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते ऑनलाईन उपस्थित राहतात. त्यामुळे २२ डिसेंबरपासून सुरू होणार्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांना नागपुरात जाणे शक्य नव्हते. मुख्यमंत्र्यांची तब्येत लक्षात घेऊन, त्यांना अधिवेशनात उपस्थित राहता यावे म्हणून नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यावर्षी मुंबईत घेण्याचे ठरले.
अधिवेशनाच्या साधारण दोन दिवस अगोदर मुख्यमंत्री स्वत: विधिमंडळात येऊन पाहणी करून गेल्याची जोरदार चर्चा होती. त्यासाठी तेथील कर्मचार्यांना सुमारे दीड तास अगोदरच घरी सोडण्यात आले. सीसीटीव्ही बंद करण्यात आले, असेही सांगितले जात होते. मुख्यमंत्र्यांना विधिमंडळात येताना कोणताही त्रास होऊ नये, त्यांच्या गाडीला धक्के बसू नयेत म्हणून विधिमंडळा जवळीलरस्तेही गुळगुळीत करण्यात आले होते. ही सर्व व्यवस्था केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशना दरम्यान विधिमंडळात हजर रहावे म्हणून होता. अजितदादांचा शब्द आणि चोख प्रशासकीय व्यवस्था यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला उपस्थित राहणार अशी अटकळ विरोधी पक्षांसह सर्वांनी बांधली होती. मात्र, २२ डिसेंबर रोजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री काही उपस्थित राहिले नाहीत.
अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे स्विय सचिव मिलिंद नार्वेकर हे विधिमंडळात दिसले होते. त्यावरून पुन्हा मुख्यमंत्री आता येणार अशी चर्चा विधिमंडळात सुरू झाली होती. मात्र, संपूर्ण दिवस उलटून गेला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात काही आले नाहीत. आज नाही, उद्या येतील.. असे म्हणता..म्हणता… संपूर्ण अधिवेशन संपले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही अधिवेशनात उपस्थित राहिले नाहीत. विरोधकांनीही मुख्यमंत्री अधिवेशनात का येत नाहीत, असा सवाल उपस्थित केला. त्यावरून अजितदादांनाही घेरले. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायर्यांवरून ‘मुख्यमंत्री हाऊस मे आओ’, अशा घोषणा दिल्या. इतकेच काय ‘दादा काय म्हणाले? मुख्यमंत्र्यांना शोधून आणा,’ अशा घोषणा देत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांबाबत अजितदादांनी दिलेल्या शब्दाची त्यांना आठवणही करून दिली.
मुख्यमंत्री अधिवेशनात येत नाहीत, यावरून मोठा वादही झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करा, असे वक्तव्य केले. त्यावरून सत्ताधारीही चांगलेच संतप्त झाले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर आपला बाप आजारी असल्यावर आपण चर्चा करतो, असे सांगत विरोधकांना चिमटा काढला. त्यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. मात्र, मुख्यमंत्री येणार, असेच सत्ताधारी पक्षातील मंत्री, आमदारांकडून वारंवार सांगण्यात येत होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार होती. किमान निवडणुकीत मतदान करण्यासाठी तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात येतील, असे मानले जात होते. त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्र्यांची वाट पहिली जात होती. मात्र, निवडणूक रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात येणार नाहीत हे स्पष्ट झाले.अधिवेशन संपले; पण मुख्यमंत्री काही अधिवेशनात आले नाहीत आणि त्याबरोबर अजितदादांचे शब्द चक्क खोटे ठरले. मात्र अधिवेशनाच्या समारोपानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधीमंडळात येऊन दोन्ही सभागृहाची पाहणी केली होती. विधिमंडळात झालेल्या प्रत्येक विषयात सहभागी होऊन मार्गदर्शन करत होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री सभागृहात येणार होते. परंतु कोरोना संख्या वाढत आहे त्यामुळेच त्यांना आम्ही अधिवेशनास न येण्याची विनंती केली, असे पवार यांनी सांगितले.




