राजकारण

उद्धव ठाकरेंचा विदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार : आ. रवी राणा

नवी दिल्ली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा काळा पैसा परदेशात आहे. हॅाटेल, घर स्वरूपात त्यांनी विदेशात संपत्ती कमावली आहे. माझ्याकडे ठाकरेंच्या काळ्या संपत्तीचे पुरावे असून लवकरच ईडी आणि सीबीआयकडे हे पुरावे देणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटले. तर, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादानेच अडकविण्याचा डाव आखला जातोय, असे नवनीत कौर यांनी म्हटलं. महिलेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असून मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. आता, शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी पराभव पचवायला पाहीजे, असेही नवनीत कौर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवनीत कौर आणि रवि राणा सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री यांच्यावर टीका करत आहेत. यापूर्वीही १०० कोटींच्या खंडणीप्रकरणी संसदेत बोलताना खासदार कौर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं.

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. नवनीत राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या खासदारकीवर येणारं संकट तूर्त टळलं आहे. त्यानंतर, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी शिवसेना व मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.

मुंबई हायकोर्टानं नवनीत राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र फेटाळून लावत दोन लाखांचा दंड ठोठावला होता. त्यासोबतच सहा आठवड्यात जातीचा दाखला व जातवैधता प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले होते. नवनीत रवी राणा यांनी फसवणूक करून व बनावट कागदपत्रे सादर करून जात प्रमाणपत्र मिळवले आहे, असा ठपका न्यायालयाने ठेवला होता. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं आज हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर टीका केली. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही गंभीर आरोप केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button