१२ आमदारांच्या नियुक्तीसाठी सरकार आग्रही नाही, तुम्ही का?; राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
पुणे : १२ आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेते शरद रणपिसे यांना सुनावले. १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला सुनावले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर रणपिसे यांनी राज्यपालांची भेट घेऊन १२ सदस्यांची नियुक्ती करण्याची विनंती केली. या सदस्यांना विधान परिषदेत येण्याचा मार्ग मोकळा करावा, असंही ते म्हणाले. त्यावर राज्यपालांनी रणपिसे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे मित्रं आहेत. ते इथेच आहेत. सरकार याबाबत आग्रह धरत नाहीत. तुम्ही का आग्रह धरता?, असा सवाल राज्यपालांनी केला. या विषयावर राज्य सरकारने पाटपुरावा केला पाहिजे, असं त्यांनी रणपिसेंना सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो होतो. त्यावेळी या १२ आमदारांच्या नियुक्तीचा विषय काढला होता. तसेच हे प्रकरण कोर्टातही गेलं. त्यावर कोर्टाने सूचक विधान केलं आहे, असं सांगतानाच आज त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही. आज स्वातंत्र्य दिन आहे. या विषयावर नंतर बोलेन, असं अजित पवार म्हणाले.
आज स्वातंत्र्य दिन आहे. कोणताही राजकीय विषय नाही. मात्र, काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी राज्यपालांकडे १२ आमदारांच्या नियुक्तीचा विषय काढला. त्यावर काँग्रेसचे नेते म्हणून तुम्ही मागणी करत आहात. पण तुमचे नेते काहीच पाठपुरावा करत नाहीत, असं राज्यपालांनी त्यांना सांगितलं. यावरून तुम्हीच काय ते समजून घ्या. काँग्रेस नेते आणि इतरांमध्ये समन्वय नसल्याचं यातून दिसून येतं, असंही ते म्हणाले.