Top Newsराजकारण

‘सुल्ली डील’ प्रकरणात गुन्हा दाखल, कठोर कारवाईचे गृहमंत्री वळसे-पाटलांचे आदेश

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सुल्ली डील अ‍ॅपवर मुस्लीम महिलांचे फोटे अपलोड करुन त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील-यांनी तत्काळ दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिली आहे. महिला आयोगानेही याची गंभीर दखल घेतली आहे.

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीआयडी मुंबई येथेही गुन्हा दखल करण्यात आला आहे, एका विशिष्ट समाजातील महिलांना अशा प्रकारे टार्गेट करणे दुर्दैवी आहे. याचा तपास करुन पुढील कारवाई तातडीने केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या महिलांसंबंधीची माहिती वेगवेगळ्या समाज माध्यमांवरुन काढून टाकण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच महिलांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी मदत करणाऱ्या ‘गिटहब’ या प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. सुल्ली डील नावाच्या ॲप वरून मुस्लीम महिलांचे फोटो, फाईल व त्यासमोर त्यांची किंमत लिहून प्रसारित केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत; असे मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने दिसून येते. या सुल्ली डील ॲपवरून महिलांसंबंधीची माहिती विविध समाज माध्यमांवरसुद्धा प्रसारित झाली आहे. त्यामुळे सर्व समाज माध्यमंवरून ती माहिती तत्काळ काढून टाकण्यात यावी. तसेच असे ॲप तयार करून संकलित माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिटहब’ विरुद्धसुद्धा कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाने महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button