राजकारण

अर्णवला बेड्या ठोकल्या म्हणून सचिन वाझेला लटकवताय का? उद्धव ठाकरे आक्रमक

अधिवेशनाचे सूप वाजले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अर्णव गोस्वामी प्रकरणावरुन फडणवीसांना टोला

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात नाव समोर आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी सभागृह दणाणून सोडलं. त्यावर सत्ताधाऱ्यांनीही अन्वय नाईक प्रकरणावर फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला. आता अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्णव गोस्वामी प्रकरणावरुन फडणवीसांना टोला लगावला आहे. एकाला बेड्या टाकून आरोपी किंवा संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून सचिन वाझेंना लटकवताय का? असा खोचक सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय.

सचिन वाझे पूर्वी शिवसेनेत होते. २००८ ला होते. त्यानंतर त्यांनी सदस्यत्व रिन्यू केलेलं नाही. त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही. हिरेन प्रकरण लावून धरलं, ते धरायलाच हवं. मात्र डेलकर प्रकरणात तर भाजपचा मंत्री आहे. सचिन वाझे तर मंत्री नाही. पक्षपातीपणे का बघताय? सचिन वाझेला का लटकवताय? एकाला बेड्या टाकून आरोपी किंवा संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून?, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अर्णव गोस्वामींचं नाव न घेता फडवीसांवर टीका केलीय. दरम्यान, अन्वय नाईक प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सचिन वाझे होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना हा सवाल केला आहे.

मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा, अशी तपासाची पद्धत नसते. कुणी तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या सुरू आहे, असं सांगतानाच सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्रं तयार केलं जात आहे. ते कशासाठी?, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. पूजा चव्हाण प्रकरण ते मनसुख हिरेन प्रकरणामुळे गाजलेल्या या अधिवेशनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अधिवेशन घेणं कोरोनात आव्हानात्मक होतं. पण नियम पाळून अधिवेशन घेतलं. विरोधकांनीही उत्तम सहकार्य केलं. परवा अर्थसंकल्प सादर केला. आव्हानात्मक स्थिती असतानाही हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तरीही रडगाणं न गाता ‘महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही’, हे आपलं ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार सर्व घटकांना आपण सामावून घेण्याचा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेत असलेल्या नाणार प्रकल्पावर मोठे वक्तव्य केले आहे. नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही, जर कोकणातील नागरिकांना हा प्रकल्प हवा असेल तसेच तेथील जनता या प्रकल्पासाठी जनतेचा पाठिंबा असल्यास या रिफायनरीला मान्यता देऊ, परंतु ही रिफायनरी नाणार येथे होणार नाही असे स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

रिफायनरी प्रकल्प राज्याच्या हितासाठी चांगला आहे. परंतु एखाद्या उद्योगाला आणि रिफायनरीला आम्हाला वाटले म्हणून विरोध करत नसतो. राज्याच्या हिताचा जरुर असेल आणि आहे पण तो प्रकल्प होणार आहे तेथील जनतेचा या प्रकल्पाला विरोध होता. नाणारमधील काही लोकं आमच्या भेटीसाठी आले होते. ज्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत ते देखील आले होते. त्यांनी असे म्हटलेही आम्ही जमिनी खरेदी केल्या यामध्ये आमची काय चूक त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. तुमच्यासाठी आम्ही निर्णय बदलणार नाही. त्यामुळे जनतेला पाठिंबा देत आमची भूमिका स्पष्ट शब्दांत सांगितली होती. तसेच ज्यांना या प्रकल्पाचे स्वागत करायचे आहे ते करु शकतात.

रिफायनरी प्रकल्पासाठी आजसुद्धा जी जागा ठरवू आणि ठरवलेल्या जागेला स्थानिक लोकांचा पाठिंबा असेल तर आमचा काही त्याला विरोध नाही परंतु ती रिफायनरी नाणारला होणार नाही हा आमचा निर्णय झाला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पर्यायी जागाही आहे. परंतु कोणताही प्रकल्प राज्याच्या हिताचा असेल तर त्याला सोडता कामा नये हे आम्हाला माहिती आहे. परंतु हा प्रकल्प जिथे जागा ठरवू तेथे या प्रकल्पाला स्थानकांचा विरोध नसेल तर तिकडे तो बनवण्यात येईल तसेच रिफायनरी प्रकल्पाला आजपासून नाणार म्हणू नका असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

कारशेड कांजूर मार्गमध्येच होणार

कांजूर कारशेड प्रकरण न्यायालयात गेला आहे. यावर मुंबईला न्याय नक्कीच मिळेल. कांजूरमार्गला कारशेड करणे हे भविष्याच्या हिताचे आहे. तिथे जसे आरेला १ कारशेड होऊ शकते. भविष्यात ट्रॅफिक वाढल्यास पुन्हा आरेची जागा अपुरी पडली असती त्यामुळे भविष्यात आपल्याला दुसरी जागा शोधावी लागली असती त्यामुळे कांजुरमध्ये कारशेड केल्यास तिकडे ३ लाईनची कारशेड होईल. कारशेड कांजूरला केल्यास त्याची कनेक्टिव्हीटी बदलापूर अंबरनाथला केली जाईल. त्यांनाही मुंबईत येणे-जाणे सोयीस्कर होईल. पुढील १०० वर्षांसाठी याचा उपयोग होईल तसेच आरे मध्ये करण्यात आलेले बांधकाम फुकट जाणार नाही असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button