Top Newsराजकारण

ठाण्यात फेरीवाल्यांचा अधिकाऱ्यांवरील हल्ला दुर्दैवी, सरकारकडून कठोर कारवाई : संजय राऊत

ठाणे : ठाण्यात फेरीवाल्यानं जे केलं ते दुर्दैवी आहे, त्यावर कडक कारवाई राज्य सरकार करत आहे. सरकारनं हा विषय गांभीर्यानं घेतला आहे, असे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा विभागाच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकूहल्ला केल्याने त्यांची दोन बोटे तुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट कापले गेले आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यास पोलिसांनी अटक केली असून अमरजीत यादव असं त्याचं नाव आहे. सोमवारी पिंपळे यांचं पथक घोडबंदरच्या कासारवडवली येथील मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेले होते. सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही कारवाई सुरू होती. त्याच वेळेस एका फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावत असतानाच संतप्त झालेल्या यादव यानं रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकूहल्ला केला. त्याने त्यांच्या डोक्यावर चाकू भिरकवला असता बचाव करण्यासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला, त्यात त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून खाली पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button