अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; पत्नीलाही ‘ईडी’चे समन्स

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) समन्स बजावले आहे. उद्या सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी ही माहिती दिली आहे.
सीबीआयने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने या याचिकेचा निर्णय राखून ठेवला आहे. ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. ईडीने देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, त्यांची पत्नी आरती यांना समन्स बजावलेलं आहे. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही अद्याप ईडीच्या चौकशीला हजर राहिलेलं नाही. याबाबत देशमुख यांचे वकील घुमरे यांनी ईडीला आम्ही वारंवार पत्राद्वारे विनंती केली आहे की तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते सांगा आम्ही देऊ. त्याचप्रमाणे सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे सगळं ऑनलाईन सुरु आहे तर चौकशीही ऑनलाईन माध्यमातून घ्या अशी आम्ही मागणी केली आहे, असे म्हणाले.
आरती देशमुख यांना आजच समन्स दिलं आहे. त्या ६६ वर्षांच्या आहेत. त्यांना कोरोना झाला आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्या गृहिणी आहे. त्यांचा या व्यवहाराशी काही संबंध नाही, असा दावाही घुमरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
वाझे आणि देशमुखांची फक्त एकदाच भेट
सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या कमिशनसमोर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या ठिकाणी सचिन वाझे याने प्रतिज्ञापत्र साद केलंय. त्यात तो काही बोलत नाही. त्यात तो ४ कोटी ७० लाख रुपयांबाबत काही बोलत नाही. अनिल देशमुख यांना भेटल्याचंही वाझे सांगत नाही. आपण फक्त जानेवारीमध्ये एकदाच भेटल्याचं सांगत वाझे सांगत असल्याचंही घुमरे म्हणाले. ईडी आणि सीबीआय जेव्हा जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस तिथे असते. मात्र, आयोगासमोर मोकळ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिलं आहे, असंही घुमरे यांनी म्हटलंय.
आयोगासमोर आलेल्या प्रतिज्ञापत्रात सचिन वाझे याने पैसे दिले असं सांगत नाही. सचिन वाझेने दिलेला जबाब हा दबावाखालीच असावा. अधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब दबावाखालीच असतो. सीआरपीसीमध्ये पोलिसांसमोर दिलेल्या जबाब स्वीकारला जात नाही. १०० कोटी रुपयांचा आरोप खोटा आहे. बारची संख्याही विसंगत आहे, असा दावाही घुमरे यांनी केलाय.




