सचिन वाझेंचे बनावट आधार कार्ड ‘एनआयए’च्या हाती!
सुशांत खामकर नावाने वाझेंचे ट्रायडंटमध्ये वास्तव्य

मुंबई : सचिन वाझे हे काही महिन्यांपासून घरी राहत नव्हते. त्यांचा अनेक दिवसांपासूनचा मुक्काम हा ट्रायडंट हॉटेलमध्ये आढळला होता. पण ट्रायडंट हॉटेलमध्ये राहताना त्यांनी सुशांत सदाशिव खामकर या नावे बनावट आधारकार्ड तयार केले होते. या आधारकार्डवर फोटो मात्र सचिन वाझे यांचाच होता. आपले नाव जाहीर होऊ नये तसेच ओळख पटू नये म्हणून त्यांनी असा प्रकार केला असल्याची माहिती आहे. सचिन वाझे यांच्याकडून वापरात असलेले बनावट सीमकार्डही एनआयएने हस्तगत केले आहेत. त्याशिवाय सचिन वाझे यांची डायरीदेखील एनआयएला मिळाली आहे. या डायरीमध्ये सचिन वाझे यांच्याकडून वसुल केल्या जाणाऱ्या रकमेची माहिती तसेच संपुर्ण घेण्या देण्याच्या व्यवहारांचा समावेश होता असेही समोर आले आहे. सचिन वाझे यांच्या मर्सिडिज गाडीतूनही नोटा मोजण्याची मशीन, पाच लाख रूपये सापडले होते. सीएसटीच्या पार्किंग लॉटमध्ये ही मर्सिडिज सापडली होती.
मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सीचे अटक केलेले एपीआय सचिन वाझे यांचा आणखी एक मोठा प्रताप आता समोर आला आहे. एनआयएमार्फत सुरू असलेल्या चौकशीत सचिन वाझेंचे बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. वाझेंकडून याच आधारकार्डाचा वापर केला जात होता. सचिन वाझे यांचा ट्रायडंट येथे मुक्काम होता. पण त्याचवेळी वेगळ्या ओळखपत्राच्या आधारे सचिन वाझे याठिकाणी राहत असल्याची माहिती एनआयएच्या तपासात उघड झाली आहे. एनआयएने ट्रायडंट हॉटेलमध्ये सध्या कसून चौकशीला सुरूवात केली आहे. त्यामध्येच आता बनावट आधार कार्डचाही छडा लागला आहे. सचिन वाझे यांच्या या बनावट आधार कार्डाची माहिती जाहीर झाली आहे.
ज्या ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझे राहत होते, त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचाही जबाब एनआयएमार्फत घेण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी सचिन वाझेंना पाहिले आहे अशा कर्मचाऱ्यांचा जबाब एनआयए या प्रकरणात नोंदवून घेत आहे. ट्रायडंटच्या महागड्या अशा सूट्समध्ये सचिन वाझे हे अनेक महिने राहत होते. मोठ्या प्रमाणात असे प्रत्येक दिवसाचे ट्रायडंटचे भाडे आहे. पण लॉकडाऊन काळातही महिनोमहिनेही राहिल्याचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएकडून ट्रायडंट हॉटेलमधून शोधण्यात येत आहे.