व्यंगचित्राद्वारे भाजपचा राष्ट्रवादीला टोला; दिल्लीत ‘काका मला वाचवा’चा आवाज

मुंबई: गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्यासाठी भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. दिल्लीत रविवारी शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीनंतर तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल देशमुख यांना अभय दिल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्यंगचित्र ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. या व्यंगचित्रात घाबरलेले अनिल देशमुख आणि त्यांच्यापाठी शरद पवारांची सावली दाखवण्यात आली आहे. अनिल देशमुख हे ‘काका मला वाचवा’ अशी हाक मारत असल्याचे दिसत आहे. हे व्यंगचित्र ट्विट करताना भाजपने एक कॅप्शनही लिहली आहे. पूर्वी शनिवार वाड्यातून आलेला आवाज काल दिल्ली मधून येत होता म्हणे. भाजपच्या या टीकेचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीच्या दिशेने होता.