सुट्टीच्या दिवशी गर्दी होताच तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटकांना बंदी
विरार : अनलॉकडाऊनची प्रक्रिया सुरु झाली असली तरी जिल्हा प्रसाशनाने येत्या ८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील समुद्रकिनारे, धबधबे, तलाव, किल्ले, नदी याठिकाणी पर्यटकांना बंदी घातली होती. जिल्हा प्रशासनाने वसई विरार महापालिका क्षेत्र वगळले होते. त्यातच महापालिकेने यासंबंधी कोणतीही भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे नागरिकांनी शनिवार व रविवार असे सुट्टीचे दिवस साधून आपला मोर्चा वसईतील प्रसिद्ध तुंगारेश्वर आणि चिंचोटीच्या धबधब्याकडे वळवला होता. पर्यटकांनी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून खूपच गर्दी केली होती. त्याची दखल घेत महापालिका आणि पोलिसांनी याठिकाणी बंदी घालून नाकाबंदी करून रस्ता बंद केला आहे.
वसई तालुक्यातील धबधबे, समुद्र किनारे, तलाव, किल्ले याठिकाणी गर्दी करण्यासाठी बंदी आदेश कोण काढणार यावरून महापालिका आणि पोलीस आयुक्त कार्यालय यांच्यात एकवाक्यता होत नव्हती. परंतु दोन दिवस पर्यटकांनी केलेली गर्दी सोशल मिडीयावर झळकल्यानंतर अखेर तुंगारेश्वर डोंगरावर जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. तुंगारेश्वरसह आता चिंचोटी धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांनी बंदी घातल्याचे आदेश पोलीस आयुक्त कार्यालयातून जाहिर करण्यात आला आहे.
चिंचोटी आणि तुंगारेश्वर येथील धबधबे वन विभागाच्या अखत्यारीत येतात. पाऊस सुरु झाला की याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. यावेळी पाऊस सुरु झाल्यावर कोरोनाचे सर्व नियम बाजूला सारून पर्यटकांनी दोन्ही ठिकाणी गर्दी केल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेऊन तुंगारेश्वर येथील धबधब्यावर जाणारा रस्ता बंद केला. त्यामुळे आता पर्यटकांना धबधब्यावर जाता येणार नाही. तुंगारेश्वर आणि चिंचोटी धबधब्यात अतिउत्साह पर्यटकांचे दरवर्षी मृत्यू होत असल्याने दोन्ही धबधबे धोकादायक ठरले आहेत.