अर्थ-उद्योगफोकस

कोरोना संकटात महागाईचा ६ महिन्यातील उच्चांक

मुंबई : कोरोनाच्या संकटाला संपूर्ण देश सामोरं जात असतानाच महागाईच्या वाढत्या दरानंही सर्वसामान्यांचं जगणं कठीण केलं आहे. कारण किरकोळ महागाईच्या दरानं गेल्या सहा महिन्यातील उच्चांक गाढला आहे. मे महिन्यातील ग्राहक निर्देशांकात वाढ होऊन महागाईचा दर ६.३० टक्क्यांवर पोहोचला आहे.

रिझर्व्ह बँकेनं किरकोळ महागाईचं लक्ष्य ४ टक्के इतकं ठेवलं होतं. यात महागाईचा दर सर्वाधिक ६ टक्के आणि कमीतकमी २ टक्क्यांपर्यंत ठेवण्याचं लक्ष्य आरबीआयचं होतं. पण महागाईचा हा दर आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्याही आवाक्याबाहेर गेला आहे.

विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात महागाईचा दर ४.२३ टक्के इतका होता. पण मे महिन्यात अन्नधान्याचा महागाईचा दर (Food Inflation) ५.०१ टक्क्यांवर पोहोचला. एप्रिल महिन्यात हाच दर फक्त १.९६ टक्के इतका होता. किरकोळ महागाईचा दर अतिशय महत्वाचा असतो कारण याच दराच्या आधारावर भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरण जाहीर करत असते. गेल्या आठवड्यातच आरबीआयची महत्वपूर्ण बैठक झाली. यात आरबीआयनं सलग सातव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. सध्या रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button