शीना बोरा जिवंत; इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा

मुंबई : शीना बोरा हत्याकांड देशभरात चांगलंच गाजलं होतं. आता या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मात्र हा खुलासा या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जीनं केला आहे. आरोपी इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात इंद्राणीनं केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात खळबळ माजली आहे. शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणीनं या पत्रात केला आहे. इतकंच नाही तर शीनाला काश्मीरमध्ये एका महिलेनं पाहिल्याचंही तिनं म्हटलं आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आपल्या पत्रात मुखर्जीनं लिहिलं आहे की, नुकतीच ती तुरुंगात एका महिलेला भेटली होती, जिने काश्मीरमध्ये शीना बोराला भेटल्याचं सांगितलं. त्यामुळेच सीबीआयला शीना बोराचा काश्मीरमध्ये शोध घेण्यास सांगितलं आहे. इंद्राणी मुखर्जी सध्या भायखळा कारागृहात कैद आहे. कारागृहातून तिनं सीबीआयला पत्र लिहिलं आहे. या पत्रात तिनं शीनाचा काश्मीरमध्ये तपास करण्याची विनंती केली आहे. पत्राव्यतिरिक्त तिनं विशेष सीबीआय न्यायालयासमोर एक अर्जही दिला असून त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शीना बोरा हत्याकांडात २०१५ मध्ये अटक झाल्यापासून इंद्राणी मुखर्जी मुंबईतील भायखळा कारागृहात कैद आहे. गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर ती लवकरच वकील सना खान यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. २४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. शीना बोरा हत्या प्रकरण उघडकीस आले जेव्हा इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने उघड केले की तो दुसर्या प्रकरणात सामील होता आणि तो एका खुनाचा साक्षीदार आहे.
श्यामवर राय यांनी मुंबई पोलिसांना सांगितले की, इंद्राणी मुखर्जीने २०१२ मध्ये शीना बोरा हिचा गळा दाबून खून केला होता. ड्रायव्हरनं दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारावर इंद्राणीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली. अधिक तपासात समोर आले की शीना इंद्राणीची पहिली मुलगी होती आणि ती तिच्या आईला मुंबईत घर मिळवून देण्यासाठी तिला ब्लॅकमेल करत होती.




