मुंबई: भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त परळीजवळील गोपीनाथ गड येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज गोपीनाथगड येथे दर्शन घेतले। pic.twitter.com/q5gA31U6o7
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 12, 2021
नेहमी गोपीनाथ गडावर सगळे नेते, कार्यकर्ते, समर्थक येतात. पण आता यापुढे गोपीनाथ गडावर तुम्ही यायची आवश्यकता नाही. गोपीनाथ मुंडे यांनी गरीबांच्या सेवा करण्याचा जो वारसा दिला आहे, तो आपण गावा-गावापर्यंत पोहोचवू. गरीबातला गरीब, फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत सेवेचा हा वारसा पोहोचवू. वीटभट्टीवरील कामगार, ऊसतोड कामगार, खडी फोडणाऱ्या सगळ्यांपर्यंत गोपीनाथ गड गेला पाहिजे, असा संकल्प आज करू, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
वैद्यनाथ साखर कारखाना येथे २१ व्या गळित हंगामाचा शुभारंभ आज कारखान्याच्या गव्हाणीत मोळी टाकून आणि विधीवत पूजा करून संपन्न झाला. pic.twitter.com/kNwgXrXsEw
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 12, 2021
गोपीनाथ मुंडेंचा सर्व जाती-धर्म, सर्व पक्षातील लोक, गोरगरीबांसोबत स्नेह होता. आज अनेक जणांनी गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. अनेक राजकीय नेतेही गडावर आले पण ते पक्षभेद विसरुन. आजचा दिवस माझ्यासाठी नाही. तसाच तो माझाही दिवस नाही. तर आजचा दिवस लोकांच्या सेवेसाठी समर्पीत करणार असल्याचा संकल्प करत असल्याचे, मत पंकजांनी व्यक्त केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगड येथे नतमस्तक होऊन राज्याच्या विविध भागातून आलेल्या सर्वांशी संवाद साधला.तसेच यावेळी आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदान केले.#संघर्षदिन pic.twitter.com/qCgP2C279p
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 12, 2021
त्या पुढे म्हणाल्या, मी आजीला नेहमी विचारायचे, आजी मुंडेसाहेब जन्मले तो दिवस नेमका कसा होता. तेव्हा आजीने सांगितले, त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती. त्या दिवशी गरीबाच्या घरी गरीबाची काम करणारा राजा जन्मला. म्हणून तर आज लोक पोवाडे, भारूडाच्या माध्यमातून त्या राजाचे गुणगान गातात. देशातील सर्व नेते इथे आले की गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊनच जातात. कारण त्यांनी सगळ्या विचारांशी, जातींशी सलोखा निर्माण केला. त्यांचा हाच वसा पुढे चालवण्याचा दिवस आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
लोकनेते मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त 'संकल्प सेवेचा', 'सेवा यज्ञ' उपक्रमांतर्गत ऊसतोड कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यासमवेत भाजी भाकरीचा आस्वाद घेतला. तसेच ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवारांचे कोविड लसीकरण करून घेतले.#संघर्षदिन pic.twitter.com/5fLmpp7gZd
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 12, 2021
गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर असंख्य समर्थकांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्यानंतर पंकजा मुंडे थेट उसाच्या फडात गेल्या. तिथे त्यांनी ऊसतोडणी कामगारांसोबत वेळ घालवला. कार्यक्रमात येण्यापूर्वी पंकजांनी परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ केला. यावेळी खासदार प्रितम मुंडे, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टे, नमिता मुंदडा इत्यादी नेत्यांचीही उपस्थिती होती.
काळीज जड होते; धनंजय मुंडे भावूक
स्व. अप्पांच्या बाबतीत जयंती, पुण्यतिथी असे शब्द वापरण्याची वेळ नियतीने आमच्यावर आणली. अप्पा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला वंचित-उपेक्षित, शेतकरी-कष्टकरी, ऊसतोड कामगार यांच्या कल्याणाचा वसा आपल्यात आहे, तो जपुयात, पुढे नेऊयात. विनम्र अभिवादन अप्पा… pic.twitter.com/oXJAeM3EDO
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 12, 2021
गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्विटरवरुन काका गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे. धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहताना एक भावूक ट्विट केले आहे. स्व. अप्पांच्या बाबतीत जयंती, पुण्यतिथी असे शब्द वापरण्याची वेळ नियतीने आमच्यावर आणली. असे शब्द लावताना काळीज जड होते. तुम्ही आणि तुमचे विचार आजही अवती भोवती असल्याचे जाणवते.
ऊसतोड कामगार कल्याणाच्या तुमच्या शब्दाला मी पूर्ण करणार हा शब्द देतो. अप्पा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला वंचित-उपेक्षित, शेतकरी-कष्टकरी, ऊसतोड कामगार यांच्या कल्याणाचा वसा आपल्यात आहे, तो जपुयात, पुढे नेऊयात. विनम्र अभिवादन अप्पा… असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. धनंजय मुंडे यांचे हे भावूक ट्विट सध्या चर्चेत आहे.