‘जलयुक्त शिवार’ बंद केल्यामुळेच महापूर; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप

बुलडाणा : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ‘भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली होती. त्यामुळे नद्यांचे खोलीकरण करण्यात आले होते. पण, आज योजना बंद केल्यामुळे नद्यांचा महापूर आला’, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाले. करजखेडा गावात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कर्जखेडा गावातील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अडीच लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अद्याप शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत नाही. विमा एजंट गावागावात फिरत आहे. शेतकऱ्यांकडून ५०० रुपये घेऊन नुकसानीचा टका वाढण्याचे आमिष देत आहे. ५०० रुपये दिले तर ६० टक्के नुकसान दाखवतो आणि नाही दिले तर २० टक्के नुकसान दाखवतो, अशा प्रकारे फसवणूक सुरू आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
लोकांशी आम्ही चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तेव्हा आमच्या काळात आम्ही जलयुक्त शिवार योजना राबवली होती. या योजनेतून नदीचे खोलीकरण करण्यात आले होते. ज्यांनी केले त्यामुळे काही जणांच्या शेती वाचली आहे. ही योजना मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. पण, या सरकारने जलयुक्त शिवार योजना बंद केली. त्यामुळे खोलीकरण आणि रुंदीकरण बंद झाले, त्यामुळे या ठिकाणी पाणी साचत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, विम्याची मदत करावी, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करावे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.




