टिप्स म्युझिक कंपनीलाही बोगस लसीचा फटका?
मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. अशावेळी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणही आवश्यक असल्याचं स्पष्ट होताच अनेक कंपन्यांनी आणि सोसायट्यांनी पुढाकार घेत आपल्या कर्मचाऱ्यांना आणि सदस्यांचं लसीकरण करण्यास पुढाकार घेतला होता. यापूर्वी कांदिवलीतील हिरानंदानी सोसायटीत सदस्यांना बोगस लसी दिल्याची माहिती समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच रमेश तौरानी यांच्या टिप्स या कंपनीलाही अशाच प्रकाराचा फटका बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बॉलिवूडचे चित्रपट निर्माते रमेश तौरानी हे टिप्स इंडस्ट्रिजचे मालक आहेत. त्यांनी ३० मे आणि २ जून रोजी आपल्या कंपनीच्या जवळपास ३६५ कर्मचाऱ्यांचं लसीकरण करवलं होतं. परंतु यापैकी कोणत्याही कर्मचाऱ्याला अद्याप सर्टिफिकेट मिळालेलं नाही. यानंतर रमेश तौरांनी यांनी चिंता व्यक्त करत आपलं निवेदन जारी केलं आहे.
“आम्ही अद्यापही सर्टिफिकेटची वाट पाहत आहोत. जेव्हा माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संजय गुप्ता, एसपी इव्हेंट्सशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी १२ जून रोजी सर्टिफिकेट्स येणार असल्याचं सांगितलं. परंतु अद्याप यावर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आमच्या कंपनीतील ३६५ कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या डोससाठी १२०० रूपये अधिक जीएसटी असं शुल्क अकारण्यात आलं होतं,” असं तौरानी म्हणाले.
“आम्हाला अखेर काय देण्यात आलं, याची आम्हाला चिंता आहे. आम्ही खरंच कोविशिल्ड ही लस घेतली का आम्हाला केवळ सलाईन वॉर देण्यात आलं आहे. आम्हाला मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातून सर्टिफिकेट्स जारी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु अद्याप याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही किंवा कोणती अन्य माहिती मिळाली नाही,”