Top Newsराजकारण

शासकीय नोकर भरती परीक्षा घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या; जितेंद्र आव्हाड यांचा संताप

आव्हाडांच्या घरासमोर अभाविपचे आंदोलन

ठाणे : राज्यात शासकीय नोकरभरती परीक्षा घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, त्या कंपन्या फक्त पेपर फोडण्यासाठीच आलेल्या आहेत, असे म्हणत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या परीक्षांचे पेपर रद्द केल्याचं समर्थन केलं आहे. जर पेपर फुटला असता किंवा पेपर फुटून परीक्षा दिली असती तर मेहनत करणाऱ्या मुलांच्या मेहनतीवर पाणी पडलं असतं. मागील तीन दिवसांपासून मी सांगतोय की मला एक टक्का जरी संशय आला तर मी परीक्षा रद्द करेल. मी डायरेक्ट परीक्षा रद्द केली नाही, मी आधी इशारा दिला होता, असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिले.

लॅपटॉपमध्ये परीक्षेचा पेपर मिळाल्याने गोपनीयतेचा भंग झाला आणि पेपर फुटला आहे, अशी शंका घेत आम्ही पेपर रद्द केला. मला कळत नाही अभाविप कोणाच्या बाजूने आहे? मला हसू येते पेपर फुटलाच नाही तर मग निदर्शने कशाला, असे म्हणत आव्हाड यांनी अभाविपने त्यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. तसेच, एखाद्या मंत्र्याच्या घरावर तुम्ही आंदोलन करत आहात तर ते होणारच, असे म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीचं समर्थनही त्यांनी केलं.

ज्या कंपन्या परीक्षा घेतायंत, त्या कंपन्या वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत. राज्याच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने त्यांना पास केलं आहे. त्यांचं टेंडर इतक लो असतं की त्याच्यात परीक्षा बसू शकत नाहीत. या सगळ्या कंपन्या उचलून बाहेर फेकून द्यायला पाहिजेत. स्टाफ सिलेक्शन, बँकांच्या परीक्षा ज्या कंपन्या घेतात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोघांसोबत टायप करून परीक्षा घ्याव्यात, असे मतही आव्हाड यांनी व्यक्त केले. दरम्यान, आता म्हाडा याबाबत सगळी परीक्षा नियोजन करणार आहे. त्यासाठी आमची आज बैठक आहे, असेही त्यांनी सांगितले.

आव्हाडांच्या घरासमोर अभाविपचे आंदोलन

म्हाडातील रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून परीक्षार्थींना अडचणीत आणल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्ते आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने केली. यावेळी, राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते जमा झाले. त्यामुळे, दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आपसात भिडल्याचे दिसून आले. याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असतानाही राष्ट्रवादी आणि अभाविपचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना उचलून ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ पाहत असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button