Top Newsआरोग्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याच्या त्रास जाणवत आहे. जवळपास दिवाळीपासून उद्धव ठाकरे यांना हा त्रास प्रकर्षाने सुरु झाल्याचं कळंतय. त्या पार्श्वभूमीवर ते आज गिरगावातील एच एन रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातील १९ व्या मजल्यावरील विशेष कक्षात दाखल करण्यात आलं आहे. आज मुख्यमंत्र्यांवर कोणतीही वैद्यकीय चाचणी केली जाणार नाही आहे. उद्या सकाळी त्यांची वरिष्ठ आर्थो सर्जन यांच्या सल्ल्याने विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

मुख्यमंत्र्यांवर केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतरच मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या विशेष कक्षात तेजस ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे आहेत. तर कक्षाबाहेर मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सुरक्षा रक्षक तैनात आहेत. उद्या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या रुग्णालयात उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी येणार असल्याचीही माहिती मिळतेय.

उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.

मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता…

पुढील दोन ते तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार असून उद्धव ठाकरे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.जनतेच्या आशीर्वादाने माझी तब्येत लवकरच बरी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मानेचा आणि मणक्याचा त्रास जाणवायला लागला होता.गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे  क्षणभराचीही उसंत मिळाली नाही. त्याचा परिणाम आता जाणवायला लागला आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

एकीकडे कोरोना विषाणूची लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे. राज्यातली विकास कामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हटले तरी थोडेसे दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button