Top Newsस्पोर्ट्स

पी.व्ही. सिंधूला कांस्यपदक; विक्रमी कामगिरी करताना बिंगजिओवर मात

टोक्यो : भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. सिंधूला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, उपांत्य फेरीत ताई झू यिंगविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने तिचे ‘सुवर्ण’ कामगिरीचे स्वप्न अधुरेच राहिले. परंतु, कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात सिंधूने उत्कृष्ट खेळ केला. तिने या सामन्यात चीनच्या ही बिंगजिओचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला. या विजयासह तिने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली. सिंधूला २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्यात यश आले होते. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी ती भारताची पहिलीवहिली महिला खेळाडू ठरली. तसेच भारताचे हे यंदाच्या ऑलिम्पिकमधील दुसरे पदक ठरले.

https://twitter.com/Tokyo2020hi/status/1421814801811091456

महिला एकेरीच्या कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीच्या सुरुवातीला बिंगजिओने सिंधूला चांगली झुंज दिली. त्यामुळे दोघींमध्ये ६-६ आणि नंतर ८-८ अशी बरोबरी होती. यानंतर मात्र सिंधूने सलग तीन गुण मिळवत पहिल्या गेमच्या मध्यंतराला ११-८ अशी आघाडी घेतली. या गेमच्या उत्तरार्धात बिंगजिओचा खेळ खालावला. याऊलट सिंधूने दमदार खेळ सुरु ठेवत पहिला गेम २१-१३ अशा मोठ्या फरकाने जिंकला.

दुसऱ्या गेममध्येही सुरुवातीला बिंगजिओने सिंधूला झुंज दिली. तिने सिंधूला सहज गुण जिंकू दिले नाहीत. परंतु, सिंधूने खेळ उंचावला आणि या गेमच्या मध्यंतराला ११-८ अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर बिंगजिओने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत ११-११ अशी बरोबरी केली. पुढे मात्र सिंधूने पुन्हा आक्रमक खेळ करत १८-१४ अशी आघाडी मिळवली. तसेच यानंतरचे चार पैकी तीन गुण मिळवत सिंधूने दुसरा गेम २१-१५ अशा फरकाने जिंकला आणि कांस्यपदक पटकावले.

https://twitter.com/Tokyo2020hi/status/1421812328740360192

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button