Top Newsराजकारण

सरकार ५ वर्षे टिकणार हे सातत्याने का बोलावं लागतं? आशिष शेलारांचा राऊतांना खोचक सवाल

मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या युतीबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीत सर्व आलबेल असताना मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करण्याची गरज काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचं समजतंय. राष्ट्रवादीच्या नाराजीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असं वक्तव्य केलं आहे. त्यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊतांना जोरदार टोला लगावलाय. सरकार ५ वर्षे टिकणार हे तुम्हाला बोलावं का लागतं? असा सवाल शेलार यांनी केलाय.

जो माणूस आपलं पाप लपवायला बघतो. आपल्या पापांवर पांघरुण घालण्यासाठी दिखावूपणे का होईना पण बोलावं लागतो. संजय राऊतही तेच करतात. पंतप्रधान मोदी यांच्या नावावर मतं मिळवायची आणि जिंकून आल्यावर दुसरीकडे जायचं. तुमचं सरकार पाच वर्षे टिकणार असेल तर तुम्हाला सतत बोलावं का लागतं. सरकार पाच वर्षे टिकणार हे सांगणं म्हणजे आपला दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही दुबळे आहात, त्यापासून पळण्याचा प्रयत्न म्हणजेच राऊतांचं वक्तव्य असल्याचा टोला शेलार यांनी लगावला आहे.

भाजपचे बडे नेते शिवसेनेत प्रवेश करु इच्छित असल्याचं वक्तव्यही राऊत यांच्यासह शिवसेनेच्या काही नेत्यांनी केलं आहे. त्याबाबत विचारलं असता, प्रवेशाचा मुद्दा असेल तर शिवसेनेकडे कुणी पाहायलाही तयार नाही. भाजप जनतेची लढाई लढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शिवसेनेचं स्थानिक नेतृत्व येत्या काळात भाजपकडे येताना तुम्हाला दिसेल, असा दावाही शेलार यांनी केलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button