
नांदेड : भोकर मतदारसंघातील विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी अशोक चव्हाणांनी मोठ्या मनानं शिवसैनिकांना साद घातली. शिवसैनिकांनी देखील अशोक चव्हाणांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. अखेर, त्या विकासकामाचं भूमिपूजन शिवसैनिकांच्या हस्ते करण्यात आलं. महाविकास आघाडी आता स्थानिक पातळीवर मजबूत होत असल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीनं ते राज्य चालवत आहेत. वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांचं असल्यानं महाविकास आघाडी सरकार किती दिवस चालणार असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयमानं जुळवून घेत राज्य सरकारचं कामकाज सुरु ठेवलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील नांदेड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात महाविकासआघाडी स्थानिक पातळीवर देखील मजबूत करायची असल्याचं कृतीतून दाखवून दिलंय.
पाळज येथील आरोग्य केंद्राच्या नवीन ईमारतीचे आज भूमिपूजन झाले. याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल चव्हाण, सुभाष नाईक व त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते या कामाचे नारळ फोडण्यात आले. pic.twitter.com/7dm5K7Wnk0
— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 22, 2022
भोकर मतदार संघातील पाळज येथील आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काल अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल चव्हाण, सुभाष नाईक व त्यांचे सहकारी उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी यावेळी महाराष्ट्रात आपली महाविकास आघाडी आहे. मग शिव सैनिकांनी मागे राहू नये, असं आवाहन केलं. शिवसैनिकांनी देखील मंत्री चव्हाण यांच्या शब्दाला मान देत पुढं येऊन विकासकामांचे नारळ फोडले. मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील स्थानिक पातळीवरील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. नगर पंचायत निवडणूक निकलानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यामध्ये काही जिल्ह्यात आरोप प्रत्यारोप झाले होते. मात्र, अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी मजबूत असल्याचं कृतीतून दाखवून दिलं आहे.