Top Newsमनोरंजन

किरण मानेंनी इतर कलाकारांना त्रास दिला; अमेय खोपकर आक्रमक

मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकार किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आल्यानंतर राज्यभर वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियातून अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. याच दरम्यान आता मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भूमिका घेऊ असं म्हटलं आहे.

मला यावर काहीही बोलायचं नाही. किरण माने यांनी मालिकेतील इतर सहकलाकारांना त्रास दिला आहे. त्यांच्या वर्तवणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं. किरण यांचा आरोप आहे की, मी राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर केलं गेलं. यावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यावर योग्यवेळी मनसे आपली भूमिका मांडेल, असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

सहकलाकारांचे किरण मानेंवर गंभीर आरोप

अशातच आता मुलगी झाली हो या मालिकेचं शूटिंग ज्या साताऱ्यातील गावात सुरु आहे, तिथं एका वृत्तवाहिनीचे पत्रकार पोहोचले. या गावात सुरु असलेल्या शूटिंगही बंद पाडण्याबाबतचं एक पत्र व्हायरल झालं होतं. त्यानंतर एकूण या संपूर्ण प्रकरणी मुलगी झाली हो, मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांनी किरण माने यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. किरण माने यांच्यामुळे ही मालिका चालते, असा गैरसमज त्यांचा झाला होता, असं त्यांच्या सहकलाकारांनी म्हटलंय. मी आहे म्हणून चाललंय सगळं, मी कुणालाही कधीही काढून टाकेन, अशी भाषा त्यांनी वापरल्याचाही दावा किरण माने यांच्या सहकलाकारांनी केलाय.

राजकीय भूमिका घेतली, म्हणून त्यांना मालिकेतून काढलं गेलं, अशी खोटी बातमी किरण मानेंनी पसरवली, अशा गंभीर आरोप मालिकेतील कलाकारांनी केलाय. मुळात त्यांच्या वर्तवणुकीमुळे प्रोडक्शन हाऊसनं त्यांना या मालिकेतून काढण्यात आलं आहे, असा आरोप करण्यात आला आहे. याची त्यांना काहीही माहिती नव्हती, अशातलाही भाग नाही. त्यांना तीन वेळा ताकीद देण्यात आली होती. चौथ्या वेळी त्यांना मालिकेतून नारळ देण्यात आला, असाही दावा करण्यात आला आहे. इतकंच काय तर मुलगी झाली हो मालिकेत या मुलीचे बाप म्हणून किरण माने भूमिका करत होते, तिनंही किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहे. किरण मानेंनी सेटवर अपशब्द वापरले. मला सारखे टोमणे मारले, असंही मुलगी झाली हो मालिकेतील किरण मानेंच्या सहकलाकारांनी म्हटलंय.

…म्हणून मी केवळ शरद पवारांकडेच गेलो, किरण मानेंची ‘मन की बात’

किरण माने यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, आता शरद पवार मी मांडलेल्या बाजुवर जे निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असेही माने यांनी म्हटलं आहे. मी शिक्क्यांना घाबरत नाही, शिक्के मारणारे हे कोण. मी शरद पवार यांच्याकडेच का गेलो तर, शरद पवार हे अभ्यासू, विचारी, विवेकी आणि संयमी व्यक्तीमत्व आहे. भारतातील कला क्षेत्राचं त्यांना प्रचंड ज्ञान आहे, अभ्यास आहे. त्यांच्यासारखा दुसरा नेता देशात नाही, बाकीचे उथळपणाने प्रतिक्रिया देणारे नेत आहेत. मी त्यांचा प्रचंड आदर करतो, म्हणून ते जर म्हणाले की, एखादी गोष्ट विचार न करता कर, तर मी ती नाही करणार, मी अंधपणे होकार नाही देत. पण, माझी बाजू त्यांच्याकडे मांडावी असे मला वाटले, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो, असे किरण माने यांनी सांगितले.

शरद पवारांपुढे मी माझी बाजू मांडली आहे, ते आता काय करायचं ते पाहतील. त्यांनी माझी बाजू घेतली तरी चालेल, नाही घेतली, मला शासन केलं तरी मला आवडेल. कारण, एका अभ्यासू माणसापुढे माझी बाजू मी ठेवलीय, असेही माने यांनी म्हटलं.

दरम्यान, याप्रकरणात चित्रपट दिग्दर्शक, लेखक समीर विद्वांस यांनी उडी घेतली आहे. एखाद्याचं मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे, अशी रोखठोक भूमिका समीर विद्वांस यांनी घेतली आहे. किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरुन त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे, असं समीर विद्वांस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत कलाकार किरण माने काम करत होते. पण त्यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आलं. त्यानंतर किरण माने यांनी राजकीय भूमिकेबाबत फेसबुकवर व्यक्त झाल्यानं आपल्याला मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला आहे. किरण मानेंच्या या दाव्यानंतर अनेक नेत्यांसह विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्या पाठिंब्यासाठी उभी राहिली आहेत. त्यामुळे या वादाला आता राजकीय वळण मिळतं की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button