Top Newsस्पोर्ट्स

अंडर-१९ विश्वचषक : भारताची अंतिम फेरीत धडक, ऑस्ट्रेलियाचा ९६ धावांनी पराभव

मेलबोर्न : भारतानं ऑस्ट्रेलियाचा ९६ धावांनी धुव्वा उडवून १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम फेरीत सलग चौथ्यांदा आणि आजवर आठव्यांदा धडक मारली. या विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होईल.

दरम्यान, भारताच्या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा कर्णधार यश धुल हा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं कर्णधारास साजेशी खेळी करून वैयक्तिक शतक झळकावलं. शेख रशिदनं ९४ धावांची खेळी करून त्याला छान साथ दिली. धुल आणि रशीदनं तिसऱ्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी रचली. त्यामुळं भारताला ५० षटकांत पाच बाद २९० धावांची मजल मारता आली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव १९४ धावांत गुंडाळला. भारताकडून विकी ओस्तवालनं तीन आणि निशांत संधूनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

https://twitter.com/BCCI/status/1488968701752020992

भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या १२.३ षटकांत २ बाद ३७ असा धावफलक असताना कर्णधार यश धुल मैदानावर उतरला आणि त्यानं शेख राशिदसह ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाची धुलाई केली. या दोघांच्या द्विशतकीय भागीदारीच्या जोरावर भारतानं धावांचा डोंगर उभा केला. यश धुलनं शतकी खेळी करताना इतिहास रचला, तर राशिदचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले.

अंगक्रीश रघुवंशी ( ६) व हर्नूर सिंग ( १६) हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर यश व राशिद यांनी दमदार खेळ केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी केली. यश ११० चेंडूंत १० चौकार १ षटकारासह ११० धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ राशिदही १०८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ९४ धावांवर बाद झाला. दिनेश बानानं ४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद २० धावा करून संघाला २९० धावांपर्यंत पोहोचवले. भारतानं अखेरच्या १० षटकांत १०८ धावा चोपल्या.

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या कर्णधारानं शतक झळकावल्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी विराट कोहलीनं २००८मध्ये वेस्ट इंडिज आणि उन्मुक्त चंदने २०१२मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते. हे तिघंही खेळाडू दिल्लीचे आहेत आणि २००८ व २०१२ मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button