
मुंबई : फडणवीस सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अत्यंत खमकी भूमिका घेत महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असा रोखठोक पवित्रा घेतला. त्यासाठी तमाम मराठीजनांच्या वतीने मराठीची ताकद दाखविण्याकरिता मराठी हाच एकमेव अजेंडा ठेवून येत्या ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे नियोजन केले. या मोर्चाला मनसेकडून शिवसेना पक्षाचे खासदार, नेते संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका मांडण्यासाठी आपणही या मोर्चाला यावे, असे निमंत्रण मनसेने संजय राऊत (Sanajy Raut) यांना फोनवरून दिले आहे.
मराठी माणसांच्या हितासाठी आमच्यातले क्षुल्लक आणि किरकोळ वाद संपवायला तयार आहोत, असे विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी करून उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यायला तयार असल्याचे थेटपणे संकेत दिले. गेली महिना दोन महिने ठाकरे बंधुंच्या युतीच्या केवळ चर्चा होत असताना त्यासाठीचे पाऊल थेटपणे उचलले जात नव्हते. अखेर हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून मनसेने पहिले पाऊल पुढे टाकून थेट संजय राऊत यांना फोन करून मोर्चात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.
हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर मराठी माणूस म्हणून मराठी भाषेसाठी आपण एकत्रित यायला हवे. ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने आपण ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. पक्षीय भेदाभेद विसरून केवळ मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेसाठी आपण मोर्चाला हजेरी लावा, असे खास निमंत्रण मनसे पक्षाकडून खासदार संजय राऊत यांना देण्यात आले आहे.
राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात दंड थोपटले
हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून, येत्या6 जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारच्या हिंदी बाबतची भूमिका मान्य नसल्याचा पुन्हा एकदा राज ठाकरेंनी पुनुरूच्चार केला आहे. सहा जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत सर्व राजकीय पक्षांनी पालकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.
राज ठाकरेंनी सांगितले की, हिंदी लादण्याचा केंद्रातील अधिकाऱ्यांचा अजेंडा असून, हा अजेंडा कोणत्याही परिस्थितीत लादू देणार नसून, हिंदी सक्ती होऊ देणार नाही. हिंदी सक्तीविरोधात काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चात कोणताही झेंडा नसेल असे सांगत यात केवळ मराठी हा एक अजेंडा असेल असेही राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.
हिंदी सक्ती विरोधात काढण्या येणाऱ्या मोर्च्यात कोण कोण नेते सहभागी होतात आणि कोण सामीन होत नाही ते मला बघायचं आहे. यावेळी दादा भुसेंसोबत काय चर्चा झाली याबाबत विचारले असता ते म्हणाले की. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे दादा भुसे यांच्याकडे नव्हती. त्यामुळे सरकारचे सर्व दाखले फेटाळून लावल्याचे राज ठाकरे म्हणाले.
मोर्चासाठी ६ जुलैची तारीख का काढली याचाही खुलासा राज ठाकरेंनी यावेळी केला. ते म्हणाले की, मोर्चासाठी मुद्दाम ६ जुलैचा दिवस निवडण्यात आला आहे. या दिवशी रविवार असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना येणे शक्य होईल असे सांगत या दिवशी सरकारला महाराष्ट्राची ताकद दिसेल असे म्हणत ठाकरेंनी एकप्रकारे राज्य सरकारला इशाराच दिला आहे. कोणतेही भांडणापेक्षा मराठी महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. विठ्ठलाला साकडं घालतो सरकारला सुबुद्धी दे. भाषा सोडून दुसरी कोणती गोष्ट आहे त्याला आमचा पाठिंबा असेल. पण, भाषेच बंधन का यामागे लॉजिक काय? शिक्षकांना पगार द्यायला पैसे आहे का? कंत्राटदार पैशासाठी बोंबलत आहे असे सांगत एखादी मोठी गोष्ट लपवण्यासाठी विषय डायव्हर्ट करण्यासाठी हिंदी सक्तीचा घाट घातला जातोय का? अशी शंका उपस्थित असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.




